डेंग्यूने मेंडकीत युवकाचा मृत्यू
By Admin | Published: August 27, 2014 11:40 PM2014-08-27T23:40:49+5:302014-08-27T23:40:49+5:30
डेंग्यू आजाराने मेंडकी/बकी येथील ज्ञानेश्वर लाकडू लाळे (३५) या तरुणाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तडकाफडकी मृत्यू झाल्याने गावात व परिसरातही दहशत पसरली आहे.
चिखली : डेंग्यू आजाराने मेंडकी/बकी येथील ज्ञानेश्वर लाकडू लाळे (३५) या तरुणाचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात तडकाफडकी मृत्यू झाल्याने गावात व परिसरातही दहशत पसरली आहे.
ज्ञानेश्वर याला मागील आठ दिवसांपासून ताप येत होता. त्यास खासगी डॉक्टरकडे दाखविण्यात आले. मात्र तब्येत जास्त बिघडल्याने त्यास साकोली येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. सदर डॉक्टरनेही प्राथमिक उपचार करुन नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नागपूर येथे भरती केले असता उपचारादरम्यान बुधवारी (दि.२७) सकाळी ६ वाजतादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णाच्या नातेवाईकांनी मृत्यूचे कारण विचारले असता डॉक्टरांनी डेंग्यू आजार असल्याचे सांगितले.
डेंग्यू आजाराने मृत्यू झाल्याची बातमी गावात येऊन धडकताच गावात दहशत पसरली आहे. चिखली येथील आयुर्वेदिक दवाखाना बंद करुन या परिसरातील गावे खोडशिवणी या २० ते २५ कि.मी. दूर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडल्याने या भागातील आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडली आहे. एक महिन्याअगोदर जवळील पिपरी गावात डेंग्यू आजाराचा उद्रेक झाला होता. तर कोहळीटोला येथेही डेंगूचा रुग्ण आढळला होता. सद्यस्थितीत बकी, मेंडकी, चिखली, कोहळीटोला परिसरात तापाची साथ पसरल्याने व जलजन्य, कीटकजन्य आजाराची लागण झाल्याने संपूर्ण परिसरात फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)