देवरी नगर पंचायतीत कर्मचाऱ्यांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 12:11 AM2016-08-21T00:11:11+5:302016-08-21T00:11:11+5:30

देवरीसारख्या आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त तालुक्यातील मुख्यालयाचा ग्रामपंचायतीचा दर्जा काढून ...

Deori Nagar Panchayat employees shortage | देवरी नगर पंचायतीत कर्मचाऱ्यांची कमतरता

देवरी नगर पंचायतीत कर्मचाऱ्यांची कमतरता

googlenewsNext

उपाध्यक्षांचा सवाल : फक्त दर्जा वाढवून विकास होणार आहे का?
देवरी : देवरीसारख्या आदिवासी, दुर्गम व नक्षलग्रस्त तालुक्यातील मुख्यालयाचा ग्रामपंचायतीचा दर्जा काढून या ठिकाणी शासनाने नगर पंचायतीचा दर्जा बहार केला. परंतु अधिकारी-कर्मचाऱ्यांची पुर्तता केली नसल्यामुळे केवळ दर्जा वाढवूनच नगराचा विकास होणार काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
विकास कामे करायची असतील तर या ठिकाणी परिपूर्ण अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची त्वरित नेमणूक शासनकर्त्यांनी करावी आणि देवरी नगराच्या विकास कामात संपूर्ण सहकार्य करावे, अशी मागणी देवरी नगर पंचायतीचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके यांनी केली आहे.
रामटेके यांनी म्हटले आहे की आता नव्याने स्थापित देवरी नगर पंचायतीची निवडणूक होऊन सात महिन्याचा कालावधी लोटला आहे. ज्या विश्वासाने नगराच्या मतदार लोकांनी आम्ही नगर सेवकांना मताधिक्याने निवडून दिले त्या विश्वासाला आम्ही कुठेतरी कमी पडत आहो.
देवरी ग्रामपंचायतचे रुपांतर नगर पंचायतीमध्ये झाल्याने आता कुठेतरी देवरी नगराचा विकास हा झपाट्याने होईल असा विश्वास नागरिकांच्या मनात होता. त्याचप्रमाणे पदाधिकाऱ्यांच्याही मनात ही विकास कामे झपाट्याने करायची तळमळ आहे. परंतू विकास कामे करीत असताना मुख्य अडचण निर्माण होत आहे ती अधिकारी व कर्मचाऱ्यांची. गेल्या अनेक दिवसापासून मुख्याधिकारी प्रभारी होते.
त्यामुळे ते पूर्ण वेळ नगर पंचायतीमध्ये देऊ शकत नव्हते. आता दोन दिवसापूर्वी नविन पूर्णवेळ मुख्याधिकारी रुजू झाले आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीमध्ये अभियंताची व लेखाधिकारीची सुद्धा गरज आहे. याची नेमणूक अद्याप झालेली नाही. आता सध्या जे ग्रा.पं. मधील कार्यरत कर्मचारी आहेत. त्यांच्याकडूनच सर्व कामे करवून घेतली जात आहेत.
यामध्ये अनुभवी व नियमित अधिकारी व कर्मचाऱ्यांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे विकास कामे करण्यास गती मिळायला पाहिजे ती मिळत नाही.
नगर पंचायतीमध्ये बरेच दिवसापासून १४ व्या वित्त आयोगाकडून निधी आणि रस्ता बांधकामाकरिता निधी प्राप्त झाला आहे. तसेच आता उन्हाळ्यात पिण्याची पाण्याची भिषण टंचाई आपल्या नगरात होती.
मान्सूनपूर्व विहिरीतील गाळ काढायचा होता तो सुद्धा काढणे शक्य झाले नाही. एखाद्या कामाचे अंदाजपत्रक तयार करायचे तर त्याला अभियंता लागतो. नगर पंचायतमध्ये अभियंता व लेखाधिकारी नाही. (प्रतिनिधी)

राजकारण करू नये
नगर पंचायतमधील विकास कामांमधील सर्व गोष्टी नागरिकांना समजावून सांगणे कठीण आहे. शासन कुणाचे ही असो आम्ही ज्या नगरात राहतो तेथील विकास कामात राजकारण येऊ नये, अशी अपेक्षा देवरी नगर पंचायतचे उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके यांनी व्यक्त केली. शासनकर्त्यांनी देवरी नगराच्या विकासाला गती मिळवून देण्याकरिता त्वरित नियमित व अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: Deori Nagar Panchayat employees shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.