कृषी विभागाने सुरु केली धडक तपासणी मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:24+5:302021-07-09T04:19:24+5:30
गोंदिया : मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची जिल्ह्यात सर्रासपणे विक्री केली जात आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त गुरुवारच्या अंकात ...
गोंदिया : मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची जिल्ह्यात सर्रासपणे विक्री केली जात आहे. लोकमतने या संदर्भातील वृत्त गुरुवारच्या अंकात प्रकाशित करताच कृषी विभागाने त्याची दखल धडक तपासणी मोहीम सुरु केली आहे. शेतकऱ्यांना डीएपी खताची खरेदी करताना काळजी घेण्याचा सल्ला सुध्दा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
दरवर्षी खरीप हंगामात मध्यप्रदेशातून कमी प्रतीच्या बियाणे आणि खताची महाराष्ट्रात सर्रासपणे विक्री केली जाते. याला अनेक शेतकरी सुध्दा बळी पडत असल्याने त्यांना संपूर्ण खरीप हंगामाला मुकावे लागते. यंदा सुध्दा जिल्ह्यात मध्यप्रदेशातील कमी प्रतीच्या डीएपी खताची सरार्सपणे विक्री केली जात आहे. गोंदिया तालुक्यातील दोन तीन ट्रक कमी प्रतीच्या डीएपी खताची विक्री काही कृषी केंद्र संचालकांनी केल्याची माहिती आहे. मध्यप्रदेशातील कमी प्रतीचे डीएपी खत हे ओरीजनल डीएपी खतासारखेच असल्याचे भासविले जात आहे. या खताची किमती आठशे ते नऊशे रुपये असून त्याची महाराष्ट्रात १२०० रुपये प्रती चुगंडी प्रमाणे विक्री केली जात आहे. गोंदिया तालुक्यातील काही प्रगतीशिल शेतकऱ्यांना या खताबाबत याची शंका आल्याने त्यांनी याची तक्रार कृषी विभागाकडे केली. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. लोकमतने या संदर्भातील वृत्त प्रकाशित कृषी विभाग सुध्दा कामाला लागला असून कृषी केंद्राना भेटी देऊन मध्यप्रदेशातील कमी दर्जाच्या डीएपी खताची तपासणी सुरु केली आहे.
.................
खत खरेदी करताना घ्या काळजी
जिल्ह्यात बनावट डीएपी खत विक्रीस ठेवले जात असल्याची बाब कृषी विभागाच्या निदर्शनास आली आहे. या खताच्या पॅकींगवर छापलेल्या मजकुरातून ते डीएपी असल्याचे भासवले जाते. तथापी ते कमी प्रतीचे व बनावट खत असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा खताची विक्री सामान्य डीएपीच्या किमतीपेक्षा अत्यंत कमी किंमतीत केली जात असून यातून शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते. खत नियंत्रण आदेश १९८५ नुसार अशी विक्री करणे हे नियमबाह्य आहे. असा कुठलाही गैरप्रकार आढळल्यास त्याची तक्रार ८८५६०७८५९६ या व्हाट्सॲप क्रमांकावर करावी.
..............
त्या कृषी केंद्राचा परवाना रद्द करणार
मध्यप्रदेशातील कमी प्रतीच्या डीएपी खताची विक्री करुन शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या कृषी केंद्रावर कृषी विभागाच्या माध्यमातून धडक कारवाई केली जाणार आहे. तसेच या कृषी केंद्राचा परवाना रद्द केला जाणार आहे.
............
शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा
गोंदिया तालुक्यात मध्यप्रदेशातील कमी प्रतीच्या डीएपी खताची विक्री केली जात आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून खताचा साठा देखील जप्त केला. मात्र यानंतरही गोंदिया तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने याची कसलीच माहिती बाहेर येऊ दिली नाही. शिवाय शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी सुध्दा कुठलेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अंधारात ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.