शिक्षण विभागाचे 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' अभियान; शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा घेणार शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 01:36 PM2022-06-30T13:36:42+5:302022-06-30T13:37:59+5:30
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात.
नरेश रहिले
गोंदिया : जिल्ह्यातील अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून ५ ते २० जुलै या कालावधीत 'मिशन झिरो ड्रॉपआऊट' राबविले जाणार आहे. याअंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शाळांतील विद्यार्थ्यांची गळती शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व प्राथमिक शिक्षण अधिकारी कादर शेख यांनी दिली.
यासाठी विविध स्तरावर समित्या आणि समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिकेतील जन्म - मृत्यू कागदपत्रांचा आधार घेऊन कुटुंबाचे सर्वेक्षण केले जाईल. तसेच तात्पुरत्या स्थलांतरीत कुटुंबातील मुलांची, मूळ वस्तीतून अन्य वस्तीत स्थलांतरीत होणाऱ्या मुलांची, अन्य वस्तीतून शाळा वस्तीत स्थलांतरीत होणाऱ्या मुलांची माहिती घेतली जाईल. तसेच वस्ती, वाडी, गाव, वाॅर्ड या स्तरावर सर्वेक्षण करण्यात येईल. ग्रामस्तरावरील समितीने प्रत्येक घरी जाऊन गावातील प्रत्येक मूल शिक्षणाच्या प्रवाहात दाखल होईल, याची काळजी घ्यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
काय आहे ‘मिशन ड्राप’?
पहिल्या वर्गात असलेली बालके दुसऱ्या वर्षी ती दुसरीत दिसायला हवीत. मात्र, पहिलीत दाखल बालके दुसऱ्या वर्षी दुसरीत दिसत नाहीत. त्यांना गळती झालेली मुले संबाेधतात. त्या बालकांना ड्राप बॉक्स असे संबोधले जाते. तो ड्राॅप बॉक्स निरंक करण्यासाठी मिशन झिरो ड्राप बॉक्स नाव देण्यात आले आहे.
मुले काम करून कुटुंबाला हातभार लावतात
गोरगरिबांची मुले पोटाची खळगी भरण्यासाठी मध्येच शाळा सोडून मिळेल त्या कामाला जातात. काम करून आई-वडिलांना घर चालवण्यासाठी मदत करतात. गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापेक्षा आधी दोन वेळचे जेवण मिळावे, ही त्यांची प्राथमिकता आहे.
खाणारी तोंडे जास्त, कमावणारे हात कमी
तळहातावर कमावून जीवन जगणाऱ्या कुटुंबांची संख्याही जास्त असते. कुटुंबात एखादी व्यक्ती कमावते आणि इतर लोक बसून खातात. त्यामुळे त्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावत नाही. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलेही आई - वडिलांच्या कामात मदत करतात.
कुटुंबाला रोजगार द्या, मुले शाळेत येतील
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत समस्या समाजातून अजूनही मिटल्या नाहीत. पोटाची आग विझविण्यासाठी आई - वडिलांना लहान मुलेही सहकार्य करतात. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या हाताला रोजगार दिल्यास मूल शाळाबाह्य राहणार नाही.
- प्रा. अर्चना चिंचाळकर, सामाजिक कार्यकर्त्या, आमगाव
रोजगारासाठी पालकांचे बिऱ्हाड पाठीवरच असते. अनेक पालक रोजगारासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात. त्यामुळे मुलांची शाळा बुडते. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढते.
- ॲड. सविता बेदरकर, सामाजिक कार्यकर्त्या, गोंदिया.
मुले शाळा का सोडतात?
रोजगारासाठी पालक स्थलांतर करतात. यामुळे मुले शाळा सोडतात. गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पालकांची मुले शाळाबाह्य नाहीत. इतर राज्यातून गोंदियात रोजगारासाठी येणाऱ्यांची मुले शाळाबाह्य आढळतात.
- विरेंद्र कटरे, शिक्षक
पोटाची खळगी भरण्यासाठी परप्रातांत भटकंती करणाऱ्या लोकांचीच मुले शाळा सोडताना दिसत आहेत. पालकांच्या रोजगाराचा प्रश्न मिटला तर शाळाबाह्य मुलांचा प्रश्न मिटेल.
- अनिरूद्ध मेश्राम, शिक्षक