जि.प.च्या २८ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:21 AM2021-07-15T04:21:16+5:302021-07-15T04:21:16+5:30
नरेश रहिले गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गंभीर गैरप्रकार होत असल्याने त्या कर्मचाऱ्यांची विभागीय चाैकशी (डीई) ...
नरेश रहिले
गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून गंभीर गैरप्रकार होत असल्याने त्या कर्मचाऱ्यांची विभागीय चाैकशी (डीई) सुरू आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सहा पंचायत समितींमधील वर्ग २ व ३ च्या २८ कर्मचारी, अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. मात्र या आठ तालुक्यांपैकी सहा तालुक्यातील कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, वित्त विभाग, पंचायत, सामान्य प्रशासन, भूजल सर्वेक्षण, समाज कल्याण, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघुपाटबंधारे विभाग, कृषी संवर्धन, बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी गंभीर चुका केल्यास, अपहार, भ्रष्टाचार किंवा गंभीर आरोप असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिक्षा देण्यापूर्वी त्यांची विभागीय चौकशी केली जाते. या विभागीय चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते. बरेचदा या कारवाईत दोषी आढळणाऱ्यांची वेतनवाढ थांबविली जाते. विभागीय चौकशीत काही जण दोषमुक्त होतात तर काहींना याचा मोठा फटका सहन करावा लागतो. गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या २८ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशी सुरू आहे.
...........................
सर्वाधिक कर्मचारी देवरी तालुक्यातील
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत सहाय्यक आयुक्त कार्यालय नागपूर येथे विभागीय चौकशी सुरू असलेल्या २८ कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचारी देवरी पंचायत समिती अंतर्गत आहेत. सालेकसा पंचायत समिती अंतर्गत ६ कर्मचारी आहेत. आमगाव पंचायत समिती अंतर्गत ५ कर्मचारी आहेत. गोंदिया पंचायत समिती अंतर्गत ४ कर्मचारी आहेत. तिराेडा पंचायत समिती अंतर्गत २ कर्मचारी आहेत. तर गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत १ कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
.................
निलंबन सुरूच
गोंदिया जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांचे निलंबन सद्य स्थितीत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चुकीला माफी नाही हेच धोरण सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राबवित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात निलंबन केले जात आहे. परंतु क्षुल्लक- क्षुल्लक कारणातूनही निलंबन केले जात असल्याची चर्चा आहे. तीन महिन्यांपासून ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही त्या कर्मचाऱ्यांना कोविड दौऱ्यावर तुमच्या स्वखर्चाने जा असे अधिकारी यांनी सांगितले. परंतु हातात पैसा नाही तर दौरा करायचा कसा असे म्हणणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबित केल्याने कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे.