धानाचा बोनस त्वरित जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:28 AM2021-05-10T04:28:42+5:302021-05-10T04:28:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा शासनाने केली होती. पण पाच-सहा महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही बोनसची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. ती त्वरित जमा करण्यात यावी, अशी मागणी आमदार परिणय फुके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली हे धान उत्पादक जिल्हे म्हणून ओळखले जातात. या जिल्ह्यांतील धान उत्पादक शेतकरी खरीप हंगामात धान पिकांचे उत्पन्न घेत असतात. यासाठी शेतकरी बँका व सावकारांकडून कर्ज काढून शेतीची मशागत आणि पिकांची लागवड करत असतात. धानाचे उत्पादन जास्तीत जास्त व्हावे, म्हणून शेतकरी दिवस-रात्र एक करून धानाचे विविध पद्धतीने संरक्षण करतात. परंतु, कधी वातावरणातील बदल तर कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. शेतकरी बांधवांना कर्जाची परतफेड विहीत कालावधीत करावी लागत असल्याने आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्रावर ते धानाची विक्री करतात, जेणेकरून चुकारे व शासनाने घोषित केलेली बोनसची रक्कमही वेळेवर मिळेल. परंतु, पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम अदा करण्यात आली नसल्याची ओरड शेतकऱ्यांमधून होत आहे. शेतकऱ्यांना आर्थिक विवंचनेच्या चक्रव्युहात गुरफटून पडावे लागत आहे. यावर्षीचा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी धानावरील बोनस देण्यात यावा, अशी मागणी शेतकरी करत असल्याने शेतकऱ्यांना त्वरित बोनसचे अनुदान देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ. परिणय फुके यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.