मानव विकासच्या बसेसपासून वंचित
By admin | Published: January 13, 2015 11:02 PM2015-01-13T23:02:58+5:302015-01-13T23:02:58+5:30
कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या
केशोरी : कोणत्याही गावातील विद्यार्थीनींना शाळेत पायी जावे लागू नये, विद्यार्थीनीची शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, त्यांची उपस्थिती वाढावी यासाठी शासनाने इयत्ता पाचवी ते सातवीपर्यतच्या विद्यार्थीनीसाठी बसेसची सेवा उपलब्ध केली. परंतु केशोरी परिसरातील दिनकरनगर, प्रतापगड, गोठणगाव, चिचोली, वडेगाव (बंध्या), परसटोला, बोंडगाव (सुरबन), पुष्पनगर अ, पुष्पनगर ब या गावासाठी साकोली आगार प्रमुखानी बसफेरी सुरू न केल्यामुळे येथील २४५ शालेय विद्यार्थीनींना अजूनही पायी चालत शाळेत यावे लागते.
अहिल्याबाई होळकर बस पास सवलत आणि इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थीनीसाठी मानव विकासअंतर्गत बस पास सवलतीअंतर्गत बसफेरी सुरू केली आहे. परंतु केशोरी येथील विविध शाळा, महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीसाठी मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याच्या संदर्भात सबंधीत शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रयत्न केले.
साकोली आगार प्रमुख केशोरी परिसरातील विद्यार्थीनीसाठी बसफेरी सुरू करण्यास असमर्थ ठरले. या मागणीसंबधी मुख्याध्यापकांनी जिल्हाधिकाऱ्यंना विनंती करून मानव विकास बसफेरी सुरू करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी गोंदिया यांनी त्याचे पत्र क्र. जिकाना/संकीर्ण/६१०/२०१४ दि. ४.०९.२०१४ अन्वये साकोली आगर प्रमुखांच्या नावे पत्र देऊन मानव विकास अंतर्गत बसफेरी सुरू करण्याचे आदेश देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल मागीतला.परंतु चक्क साकोली आगार प्रमुखांनी सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न करता जिल्हाधिकाऱ्यांच्या पात्राला केराची टोपली दाखविली आहे.
वास्तविक मानव विकासअंतर्गत सुरू असलेल्या बसफेऱ्यांचे नियोजन करण्याचे अधिकार सबंधित आगार प्रमुखांना देण्यात आली आहेत.परंतु म.रा. परिवहन मंडळातील अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी केशोरी परिसरातील २४५ शालेय विद्यार्थीनी अजून शाळा-महाविद्यालयात पायदळ येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (वार्ताहर)