औषधोपचारापासून गरीब बालके वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 09:55 PM2018-05-05T21:55:29+5:302018-05-05T21:55:29+5:30
गोरगरीब रुग्ण औषाधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे.
देवानंद शहारे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गोरगरीब रुग्ण औषाधोपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शासनाने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. आता या योजनेचे नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आले आहे. मात्र या योजनेचा लाभ मागील महिनाभरापासून गरीब बालक व महिलांना मिळत नसल्याने त्यांना औषधोपचारापासूृन वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील एकमेव महिला व बाल रुग्णालय असलेल्या बाई गंगाबाई महिला रूग्णालयात (बीजीडब्ल्यू) मागील महिनाभरापासून महिला व बालकांना या योजनेतंर्गत उपचार मिळत नसल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जावून उपचार घ्यावे लागत आहे. याचा आर्थिक भुर्दंड बसत असल्याने गोरगरीब रुग्ण अडचणीत आले आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासूनच येथील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या एमसीओ डॉ. जयंती पटले अनुपस्थित आहेत. मे महिना लागूनही त्या कामावर रूजू झाल्या नाहीत. त्यामुळे रूग्णालयात दाखल बालकांचे सदर योजनेंतर्गत एनरोलमेंट होत नाही. त्यामुळे ही बालके औषधोपचारापासून वंचित असल्याची रूग्णांची ओरड आहे. विशेष म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत रूग्णालयात दाखल बालकांचे एनरोलमेंट केले जाते. त्यानंतर त्यांच्यावर नि:शुल्क औषधोपचार केला जातो. मात्र एनरोलमेंट करून घेणारे संबंधित अधिकारीच सातत्याने अनुपस्थित असल्यामुळे बालकांना औषध मिळत नसल्याचे त्यांच्या पालकांनी सांगितले आहे. गंगाबाई रूग्णालयातील महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या केंद्रात संबंधित कर्मचाऱ्यांसाठी थम इंप्रेशन मशीन लागलेली आहे. मात्र त्यानुसार कर्मचाºयांचे वेतन निघत नसल्यामुळे कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याची माहिती आहे.
वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्यांच्यावर कारवाई करीत नसल्याची रूग्णांची ओरड आहे. याकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
वर्षभरात ३१७ प्रकरणे
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या आर्थिक वर्षात एकूण ३१७ शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. त्यावर ५२ लाख ९२ हजार रूपयांचा खर्च झाला. यात प्रसूती शस्त्रक्रिया १६२ असून त्यावर १९ लाख ४४ हजार रूपयांचा खर्च झालेला आहे. तर बालकांच्या औषधोपचाराची एकूण १५५ प्रकरणे असून त्यासाठी ३३ लाख ४८ हजार रूपयांचा खर्च झाला आहे.
एप्रिल २०१८ मध्ये शून्य लाभार्थी
एप्रिल २०१८ मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत एकाही लाभार्थ्याला लाभ मिळालेला नाही किंवा अत्यल्प प्रकरणे असावेत, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी हीच स्थिती असल्याची माहिती आहे.
वर्षभरापासून सिकलसेल मशीन बंद
येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात सिकलसेल तपासणीसाठी एक मशीन लावण्यात आली. मात्र मागील वर्षभरापासून ही मशिन बंद पडून आहे. ही मशिन सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीच्या अभियंत्याला बोलविण्यात आले होते. मात्र त्यांनी या मशिनमध्ये टाकण्यात येणार ओरीजनल पावडर उपलब्ध होत नाही. तोपर्यंत मशिन सुरू होणार नसल्याचे अधिष्ठाता यांना सांगितले. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही पावडर बोलविण्यात न आल्याने ही मशिन बंद पडून आहे. याचा फटका रुग्णांना बसत आहे.
सीबीसी मशिनचे तेच हाल
सिकसेल तपासणी मशिनसह सीबीसी तपासणी मशिन सुध्दा नादुरुस्त असल्याने गोरगरीब रुग्णांना खासगी रूग्णालयात जावून दोनशे रुपये मोजून सीबीसी तपासणी करुन घ्यावी लागत आहे. मात्र याकडे रुग्णालय प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.