गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:25 PM2018-03-17T23:25:31+5:302018-03-17T23:25:31+5:30

अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती.

 A desk chair belonging to absentee seized | गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त

गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त

Next
ठळक मुद्देम्हैसुली ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आक्रमक पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : अतिदुर्गम नक्षलग्रस्त क्षेत्र असलेल्या म्हैसुली/बोंडे या ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेवक एस.एस.सीरसाम ग्रामसभेच्या व इतर दिवशी गैरहजर राहत असल्याने गावातील विकास कामे खोळंबली होती. दरम्यान या प्रकारामुळे संतापलेल्या सरपंच व पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची खुर्ची व टेबल जप्त करुन खंडविकास अधिकाऱ्याकडे जमा केली. दरम्यान ग्रामसेवकाला धडा शिकविण्यासाठी प्रथमच अशी कारवाई करण्यात आली.
आदिवासी बहुल व दुर्गम भागात काम करण्यास बरेच कर्मचारी उत्सुक नाहीत. त्यामुळे काही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू होत नाही. तर काही रूजू झाले तर सतत अनुउपस्थित राहतात. त्याचा फटका गावकऱ्यांना सहन करावा लागतो. गावाच्या विकासात ग्रामपंचायतची भूमिका महत्त्वपूर्ण असून ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र देवरी तालुक्यातील म्हैसुली येथील ग्रामसेवक सातत्याने अनुउपस्थित राहत असल्याने गावकऱ्यांची कामे खोळंबली होती. शिवाय गावातील विकास कामांवर सुध्दा परिणाम होत होता. सरपंच व पदाधिकाऱ्यांनी याबाबत वांरवांर सूचना देऊन सुध्दा ग्रामसेवकाने याकडे दुर्लक्ष केले होते. शेवटी संतापलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त करून चक्क खंडविकास अधिकाºयांकडे जमा केली. दरम्यान या प्रकाराने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवक सीरसाम यांच्यावर कारवाई करुन दुसऱ्या ग्रामसेवकाची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. प्राप्त माहितीनुसार पदाधिकाऱ्यांनी १३ मार्च रोजी दुरध्वनीद्वारे ग्रामसेवकाशी संपर्क साधला असता त्यांनी १४ मार्च रोजी ग्रामपंचायत येणार असे सरपंच व उपसरपंचास सांगितले. परंतु १४ रोजी बुधवारला दिवसभर वाट पाहून ग्रामसेवक न आल्याने संतप्त पदाधिकाऱ्यांनी त्यांची खुर्ची टेबल जप्त करुन देवरी पं.स.गाठले व तिथे खंड विकास अधिकारी मनोज हिरुडकर यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली.
वरिष्ठांच्या कारवाईकडे लक्ष
विशेष म्हणजे ग्रामसेवकाची टेबल खुर्ची जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. आता वरिष्ठ अधिकारी यावर काय कारवाई करतात याकडे म्हैसुली ग्रा.पं.चे लक्ष लागलेले आहे. भर्रेगाव ग्रामपंचायतचा कार्यभार याच ग्रामसेवकाकडे असून याबद्दल भर्रेगाव येथील उपसरपंच मनोज मिरी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भर्रेगाव ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ग्रामसेवक हजर राहत नसल्याचे सांगितले.
ग्रामसेवकाची तक्रार
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी खंडविकास अधिकाऱ्यांना केलेल्या तक्रारीत म्हैसुली येथे २९ जानेवारी २०१८ रोजी ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ग्रामस्थांच्या विविध समस्या विषयी विनंती अर्ज व गावातील विकासात्मक कामाविषयी ठराव लिहिणे बाकी आहे. त्याचप्रमाणे ग्रामसेवक एस.एस.सीरसाम यांच्याकडे ग्रामपंचायत भर्रेगावचा कार्यभार आहे. म्हैसुली बोंडे ग्रा.पं. करिता सोमवार, बुधवार व शुक्रवार हे दिवस ठरविलेले आहेत. परंतु ग्रामसेवक या दिवशी सुद्धा गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांना लागणारे दस्ताऐवज मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. नियोजनबद्ध मासिक सभा ठरविणे, विशेष सभा घेण्याकरिता नियोजनात्मक संकल्पना करण्याकरिता ग्रामसेवक ग्रामपंचायतमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे.

Web Title:  A desk chair belonging to absentee seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.