पाठपुरावा करूनही पांगोळी उपेक्षितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2016 12:27 AM2016-09-15T00:27:23+5:302016-09-15T00:27:23+5:30

गोंदियाजवळून वाहणाऱ्या पांगोळी नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे.

Despite follow-up, Pangoli neglected | पाठपुरावा करूनही पांगोळी उपेक्षितच

पाठपुरावा करूनही पांगोळी उपेक्षितच

Next

गोंदिया : गोंदियाजवळून वाहणाऱ्या पांगोळी नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया पांगोळीच्या काठावर वसलेले आहे. तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हा सीमेवर वाघ नदीत तिचा विलय होता. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी पिकासाठी पांगोळीच्या पाण्यावर अवलंबून असतात. हजारो शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र सद्यस्थितीत ही नदी प्रदूषित झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांवर भविष्यात संकट येवू शकते. मात्र शासनाचे त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे.
पांगोली नदीच्या पुनरूत्थानासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने पुढाकार घेत नदीचे निरीक्षण केले. यात त्यांना नदीचे पात्र उथळ होत चालले असून काठावरील गावात व शहरात पाण्याची पातळी सतत खालावत आहे. नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असून काठावरील वृक्षांच्या अवैध कत्तली होत आहेत. त्यामुळे नदीचे काठच नष्ट होत आहे.
काठावरील माती नदीत साचल्याने खोली कमी झाली. शिवाय शासनाने अद्यापही या नदीवर कुठेही बांध किंवा बंधारे बांधले नाही. त्यामुळे पाणी कुठेही अडविले जात नसून सरळ वाहून जाते व परिसरातील पाण्याच्या पातळीवर दुष्परिणाम होत आहे.
पांगोली नदी व सहायक नाल्यांवर दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण व सांडपाणी पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्पांची शासनाकडून उभारणी न करण्यात आल्याने पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पाळीव पाण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे काठावरील शेतपिकांना वर्षभर पाणी मिळत नाही. त्यामुळे फक्त खरीप हंगामातच केवळ धानपीक घेतले जाते. रबी किंवा उन्हाळी पीक फळभाज्या, पालेभाज्या, इतर नगदी पिके, कडधान्य व तृणधान्य घेण्याचे धाडसच शेतकरी करीत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावून शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरत आहे. शिवाय शेतीकामे सोडून शेतकरी मोल-मजुरीच्या कामावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. (प्रतिनिधी)

स्मशानघाट, मंदिरे व निर्माल्यामुळे प्रदूषण
पांगोळी नदीवर अनेक रहदारी पुले आहेत. त्यांच्या जवळच स्मशानघाट किंवा मंदिरे आहेत. मृतांचे अस्थिविसर्जन व मंदिरातील निर्माल्याचे विसर्जन नदी पात्रात होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. शिवाय दरवर्षी कृष्ण, गौरी, शारदा, दुर्गा, गणपती, हार-फुले आदि विसर्जित केले जातात. देवी-देवतांच्या प्लास्टर आॅप पॅरिसच्या मूर्त्या, प्लास्टिक पिशव्या व घनकचरा घालण्यात येत असल्याने पाणी प्रदूषित होते व गाळाचे प्रमाण वाढले आहे. मात्र शासनाचे उपसा करण्याकडे दुर्लक्ष आहे.

पुन:स्मरणासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींना पुन्हा निवेदन
लोपावस्थेकडे जाणाऱ्या पांगोली नदीच्या समस्या सोडविणे, नदीचे बचाव व संरक्षण तसेच नदीची सिंचन क्षमता वाढवून शेतीसाठी नदीचे पाणी पुरवून शेतकऱ्यांना नवसंजिवनी द्यावी. यासाठी सामाजिक सेवा व माणुसकीच्या नात्याने समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था पुढाकार घेत आहे. सदर संस्थेच्या वतीने मागील वर्षी निवेदन मुख्यमंत्री, जलसिंचन मंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले होते. सदर संस्था शासन स्तरावर ही समस्या सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहे. संस्था सचिव तिर्थराज उके, दिनेश फरकुंडे, गोपाल बनकर, मिठेश्वर नागरिकर, भोजू राऊत, उमेश मेश्राम, संजय कावळे, देवराम मानकर, रघुनाथ मेश्राम, टेकचंद लाडे, हुमराज बावणकर, मुकेश उके, जयवंता उके, डिंपल उके, संदेश भालाधरे आदी सक्रिय कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

- जलयुक्त शिवार व रोहयोच्या माध्यमातून नदीचा विकास करण्याची गरज
पांगोली नदीचे पुनरूज्जीवन व विकास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करून या योजनांद्वारे सदर नदीचा विकास आराखडा शासनस्तरावर तयार करण्यात यावा. त्याद्वारे नदीचा विकास करावा व नदी वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आता गरजेचे झाले आहे. सदर योजनांच्या माध्यमातून व विविध शासकीय विभागांच्या माध्यमातून नदीचे पुनरूज्जीवनाचे कार्य सुरू केल्यास नदीपात्र ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात येत असेल व त्या क्षेत्रातील नदी परिसराचे सदर योजनांद्वारे शासनाने विकास केल्यास ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांना गावातच रोजगार मिळेल. त्यामुळे रोजगार वाढीस शासनास मदतच होईल. शासनाला स्थानिक नागरिकांचा लोकसहभाग लाभून पांगोली नदीचे पुनरूज्जीवन व विकास करण्यास सहकार्य लाभेल. या दिशेने शासनाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कारखाने व आरोग्यावर दुष्परिणाम
शहरातून वाहणाऱ्या या नदीकाठावर व मिळणाऱ्या नाल्यांकाठी राईस मिल्स, चामडे उद्योग, लाख कारखाने, टाईल्स कारखाने व प्रशासकीय मंजुरी असलेले इतर कारखाने आहेत. या कारखान्यांतून वाहणारे दूषित पाणी व राईस मिलच्या राखेमुळे नदी प्रदूषित होत आहे. त्या पाण्याचा वापर नागरिक व जनावरे करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. राईस मिलच्या चिमणीतून सतत निघणाऱ्या धुरापासून वायू प्रदूषण होत आहे. शिवाय याच पाण्याचा वापर काठावरील शेतपिकासाठी होत असल्याने नापिकी वाढत आहे.
जिल्हास्तरावर कृती समिती गठित करा
४पांगोली नदीचे संरक्षण, विकास व पुनरूज्जीवनाकडे शासन व प्रशासनाचे सारखेच दुर्लक्ष आहे. त्यामुळे तिचे अस्तित्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून परिसरातील शेती व शेतकरीसुद्धा नामशेष होत चालले. गोंदिया व गोरेगाव तालुके तसेच गोंदिया शहर पर्यावरणीय संतूलन बिघडत आहे. यासाठी जिल्हास्तरावर कृती समिती गठित करून पांगोलीसह जिल्हाभरातील सर्व नद्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
‘समाजोन्नती...’चा सातत्याने पाठपुरावा
४आता पांगोली नदीच्या बचावासाठी व पुनरूज्जीवणासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्था पुढे सरसावली आहे. या संस्थेने नदीचे निरीक्षण करून नदीकाठावरील पिके, शेतकरी व नागरिकांच्या कल्याणासाठी समाजोन्नती संस्था साततत्याने शासनाला निवेदन देत आहे. आता पांगोली नदीच्या विकासासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना करून नागरिक व शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची मागणी केली आहे.

Web Title: Despite follow-up, Pangoli neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.