मशीन असूनही रेडिओलॉजिस्ट नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:21 PM2018-11-19T21:21:20+5:302018-11-19T21:22:00+5:30
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थितीत सुधारणेचे काहीच चित्र दिसून येत नाही. महाविद्यालयात रूग्णांच्या सोयीसाठी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन असताना रेडिओलॉजिस्ट नाहीत. अशात व्यवस्थापनाकडून कंत्राटी तत्वावर रेडियोलॉडिस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभारी अधिष्ठातांच्या भरवशावर वैद्यकीय महाविद्यालयाची गाडी कशीतरी हाकली जात असल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थितीत सुधारणेचे काहीच चित्र दिसून येत नाही. महाविद्यालयात रूग्णांच्या सोयीसाठी एक्स-रे व सोनोग्राफी मशीन असताना रेडिओलॉजिस्ट नाहीत. अशात व्यवस्थापनाकडून कंत्राटी तत्वावर रेडियोलॉडिस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभारी अधिष्ठातांच्या भरवशावर वैद्यकीय महाविद्यालयाची गाडी कशीतरी हाकली जात असल्याचे दिसून येत आहे.
येथील वैद्यकीय महाविद्यालयाला केटीएस जिल्हा रूग्णालयातून एक्स-रे व सोनोग्राफी मशीन मिळाली आहे. त्यामुळे या दोन्ही मशीन्ससाठी रेडियोलॉजीस्टची व्यवस्था करणे महाविद्यालय व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. मात्र यात महाविद्यालय व्यवस्थापन अपयशी ठरत आहे.
महाविद्यालयाला मागील कित्येक वर्षांपासून रेडियोलॉजिस्ट मिळत नसल्याने त्यांना कंत्राटी तत्वावर रेडियोलॉजिस्ट ठेवावा लागला आहे. मात्र हा रेडियोलॉजिस्ट फक्त एकच तास येत असून घाईघाईत तपासणी करून निघून जातो. या एका तासासाठी त्याला चांगली रक्कम दिली जात असल्याची माहिती आहे. यानंतर मात्र उर्वरीत २३ तास महाविद्यालयातील रूग्णांना या सेवांपासून वंचीत रहावे लागते.
विशेष म्हणजे, या गंभीर समस्येला सोडविण्यासाठी काहीच प्रयत्न केले जात असल्याचे दिसत नाही. अशीच काहीशी व्यवस्था बाई गंगाबाई रूग्णालयात बघावयास मिळत आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शस्त्रक्रीया केल्या जात असून यासाठी स्थायी बधिरीकरण तज्ज्ञ नाहीत. त्यामुळे बधिरीकरण तज्ज्ञही कंत्राटी तत्वावर घेण्याची नौबत महाविद्यालय व्यवस्थपनावर आली आहे.
२०० कर्मचाऱ्यांचा भार ६७ कर्मचाऱ्यांवर
वैद्यकीय महाविद्यालयात २०० हून अधिक चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची गरज असल्याची माहिती अधीष्ठाता डॉ. वी.पी.रूखमोडे यांनी दिली. यात मात्र फक्त ६७ पद भरण्यात आले आहेत. त्यातही २२ सफाई कामगार सेवेत आहेत. एवठ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने २०० हून अधीक कर्मचाºयांचा भार या ६७ कर्मचाऱ्यांवर आला आहे.
मापदंडांची पूर्तता नाहीच
वैद्यकीय महाविद्यालय भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने ठरवून दिलेल्या मापदंडांवर चालविले जाते. मात्र येथील महाविद्यालय संस्थेच्या मापदंडांवर खरे उतरत नसल्याची माहिती अधीष्ठाता स्वत:च देत आहेत. महाविद्यालयात ३५० खाटांची व्यवस्था असमे गरजेचे असताना येथे मात्र त्यापेक्षा अर्ध्याच खाटा उपलब्ध आहेत.