निराधारांना अनुदान अजूनही मिळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:32 AM2021-03-09T04:32:20+5:302021-03-09T04:32:20+5:30
केशोरी : निराधार योजनेंतर्गत केशोरी परिसरात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. परंतु गेल्या नोव्हेंबरपासून आता चार महिने पूर्ण झाले ...
केशोरी : निराधार योजनेंतर्गत केशोरी परिसरात अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. परंतु गेल्या नोव्हेंबरपासून आता चार महिने पूर्ण झाले आहेत. निराधारांना अजूनही अनुदान मिळाले नाही. त्यामुळे निराधारांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. निराधारांचे अनुदान बँक खात्यात पाठविण्यासाठी तालुका प्रशासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप निराधारांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाने अंध, अपंग, वृद्ध निराधार, विधवा यांना सन्मानाने जीवन जगता यावे, या चांगल्या उद्देशपूर्तीसाठी म्हणून दर महिन्याला एक हजार रुपये अनुदान लाभार्थ्यांना दिले जाते. वास्तविक हे अनुदान प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला देणेे आवश्यक आहे. बऱ्याचदा हे अनुदान देण्यास तालुका प्रशासन विलंब करीत असतो. याची ओरड लाभार्थी नेहमीच करीत असतात. आता तर तब्बल चार महिने संपूर्ण गेले. परंतु निराधारांच्या बँक खात्यात अनुदान जमा झाले नाही. अनुदान बँकेत जमा झाले किंवा नाही, हे पाहण्यासाठी स्थानिक को - ऑप. बँकेत वारंवार जाऊन हेलपाटे मारताना दिसतात. यामुळे निराधारांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे तालुका प्रशासनाने जातीने लक्ष देऊन निराधारांचे मानधन बँक खात्यात पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी निराधार मानधन लाभार्थ्यांनी केली आहे.