महिनाभरात रस्ता व दोन दिवसांत नालीचा सत्यानाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:19 AM2021-07-19T04:19:17+5:302021-07-19T04:19:17+5:30
सडक अर्जुनी : येथून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला - कन्हारटोला रस्त्याचे काम सुरू असून, महिनाभरात रस्ता उखडला आहे. ...
सडक अर्जुनी : येथून ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या नवाटोला - कन्हारटोला रस्त्याचे काम सुरू असून, महिनाभरात रस्ता उखडला आहे. दोन दिवसांत नाली कोसळून पडल्याचा प्रकार घडला आहे. यावरून कंत्राटदाराच्या कामाचे पितळ उघडे पडले असून, शाखा अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
नवटोला ते कन्हारटोला मार्गावर गेल्या ८ दिवसांपासून नाली बांधकाम सुरू आहे. त्यात नाल्याच्या किनाऱ्यावर असलेल्या भासवा रेतीचा उपयोग करून नाली बांधकाम करण्यात आले आहे. बांधकाम केलेली नाली दुसऱ्या दिवशी कोसळून पडली. येथेच गेल्या काही दिवसांपूर्वी सिमेंट रस्त्याचे काम मोठ्या धुमधडाक्यात करण्यात आले. पण महिनाभरात सिमेंट रस्ता उखडला असून, गिट्टीने डोके वर काढले आहे. ३ महिन्यांपूर्वी २.१९० किलोमीटर डांबरी रास्ता तयार करण्यात आला असूच्त्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. डांबरी रस्त्याच्या मधातून भेगा गेल्याने रस्ता एका बाजूने खाली बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एका नालीच्या ठिकाणी भगदाड पडल्याने केलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनाअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेतून होत. या बांधकामप्रकरणी शाखा अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी सरपंच छाया टेकाम, उपसरपंच हरिचंद ब्राम्हणकर, हंसराज कठाने, आशिष बागडे, वसंत बहेकर, सुरेश खोटेले, खेमराज ब्राम्हणकर, अशोक भेंडारकर व गावकऱ्यांनी केली आहे.