अटकेतील आरोपीच कोठडीतील मृत्यूचे ‘आय विटनेस’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:28 AM2021-05-23T04:28:38+5:302021-05-23T04:28:38+5:30
नरेश रहिले /(रिपोर्ट ऑन दी स्पॉट) गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील ...
नरेश रहिले /(रिपोर्ट ऑन दी स्पॉट)
गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २० मे रोजी ताब्यात घेतलेल्या चोरीच्या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एका आरोपीचा संशयास्पदरीत्या पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या मृत्यूसंदर्भात मृताचे नातेवाईक पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करीत आहेत. तर पोलीस हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला आहे हे सांगत आहेत. परंतु आमगावच्या पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या राजकुमार अभयकुमार धोतीचा (३०) मृत्यू कशाने झाला याची साक्ष देणारे ‘आय विटनेस’ त्याच्या सोबत अटक झालेले दोन तरुण आहेत.
आमगाव येथील जिल्हा परिषद शाळेत चोरी केल्याच्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन बालक असल्याने राजकुमार अभयकुमार धोती (३०), सुरेश धनराज राऊत (३१) व राजकुमार गोपीचंद मरकाम (२२) या तिघांना अटक केली. त्यांना आमगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. परंतु कोठडीत असताना राजकुमार धोती (३०) याचा शनिवारी (दि.२२) पहाटे ५.१५ वाजता मृत्यू झाला. राजकुमार याला अटक केले तेव्हा त्याच्यासोबत सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोघेही अटकेत असल्याने ते तिघेही सोबतच होते. राजकुमार याच्यासोबत काय काय झाले. मारहाण झाली किंवा नाही याची माहिती देणारे हे दोघेही ‘आय विटनेस’ आहेत. त्यांना न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ते पोलीस कोठडीत सोबत असतानाच हा प्रकार घडल्याने राजकुमार धोतीचा मृत्यू नेमका कशाने झाला याची हे दोघेच साक्ष देतील.
बॉक्स
शरीरावरचे व्रण काय सांगून जातात?
राजकुमार धोती याच्या शरीरावर व्रण असल्याचा फोटो नातेवाईक व समाजमाध्यमांनी काढला. त्याच्या शरीरावर व्रण व जखमा असल्याने त्याला मारहाण तर झाली नाही. मारहाण झाली तर त्याचे साक्षीदार अटक असलेले सुरेश राऊत (३१) व राजकुमार मरकाम हे दोन आरोपी आहेत. परंतु ते सध्या कोठडीत असतांना त्यांच्यावर पोलिसांचा दबाव असू नये म्हणून आता त्यांचे बयान घेऊ नये. ते सुटून घरी परतल्यावर त्यांचे बयान नोंदवायला पाहिजे, असाच सूर घटनास्थळावर उमटत होता.
बॉक्स
न्यायालयीन चौकशीची होतेय मागणी
पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यास त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येतो. परंतु या प्रकरणाची चौकशी न्यायालयीन प्रक्रियेतून व्हावी, अशी मागणी जोर धरत आहे. न्यायालयीन चौकशीतून सत्यता पुढे येईल. पोलीस कोठडीत झालेला चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू नेमका कशाने हे विसेरा अहवाल सांगेल. परंतु या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाल्यास ‘दूध का दूध और पानी का पानी होईल’ असेच म्हटले जात आहे.