जिल्ह्यातील ९५६ गावांमध्ये नवीन क्षय व कुष्ठरुग्ण शोधून उपचार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:20 AM2021-07-02T04:20:40+5:302021-07-02T04:20:40+5:30
गोंदिया : जिल्हास्तरीय टीबी फोरम समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात ...
गोंदिया : जिल्हास्तरीय टीबी फोरम समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे व सहायक संचालक (कुष्ठरोग) तथा जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. आर.जे.पराडकर उपस्थित होते.
यावेळी देशपांडे यांनी, शासकीय वैद्यकीय अधिकारी, खासगी वैद्यकीय व्यावसायिक व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी टीबी नोटिफिकेशन व इतर सर्व निर्देशांकात वाढ करण्यात यावी. उपचार घेणाऱ्या सर्व क्षय रुग्णांना निक्षय पोषण योजनेचा लाभ देण्यासाठी प्रत्येक क्षय रुग्णाची नोंद निक्षय प्रणालीमध्ये करणे अनिवार्य आहे. त्याकरिता क्षय रुग्णाची नोंद करण्यासाठी ५०० रुपये अनुदान देय आहे. क्षय रुग्णांच्या उपचाराअंती आऊटकमींगची नोंद केल्यानंतर ५०० रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी वेळेवर क्षय रुग्णांची नोंद निक्षय पोर्टलवर करणे अनिवार्य असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. पराडकर यांनी, टीबी फोरमचे महत्त्व व कार्य, कुष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोध व नियमित सनियंत्रण अभियान १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील ९५६ गावांमध्ये राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटी देऊन नवीन क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोधून उपचार केले जाणार आहे. क्षयरोग संबंधीच्या प्रयोगशाळा तपासण्या, एक्स-रे, संपूर्ण कालावधीचा उपचार शासकीय आरोग्य संस्था तसेच शासकीय प्रयोगशाळांमध्ये नि:शुल्क केला जातो, असे सांगितले.