विकासाच्या योजना राबवा
By admin | Published: December 30, 2015 02:27 AM2015-12-30T02:27:05+5:302015-12-30T02:27:05+5:30
सालेकसा तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
राजकुमार बडोले : सालेकसा तालुका आढावा बैठकीत दिले निर्देश
गोंदिया : सालेकसा तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तालुक्यातील प्रत्येक गावाला केंद्रबिंदू मानून विकासाच्या योजना राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सोमवारी सालेकसा पंचायत समिती येथे सालेकसा तालुका आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी आमदार संजय पुराम, जिलहा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे, पंचायत समिती सभापती हिरालाल थापनवाडे, उपसभापती राजकुमारी विश्वकर्मा, जिल्हा परिषद सदस्य लता दोनोडे, राकेश शर्मा, पंचायत समिती सदस्य दिलीप वाघमारे, प्रतिभा परिहार, प्रमिला दसरीया, जया डोये, भाजपा तालुका अध्यक्ष बाबा लिल्हारे प्रमुख्याने उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, सालेकसा हा दुर्गम, मागास व नक्षलग्रस्त तालुका आहे. या तालुक्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी यंत्रणांनी योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावीे. योजनांच्या माहितीमुळे लाभार्थ्यांना योजनांचा लाभ घेणे सोईचे ठरेल. भविष्यात अतिदुर्गम व ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना वयाचे दाखले देण्याची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात येईल. दोन एकर व त्यापेक्षा कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना २१ हजार रुपये उत्पन्नाचा दाखला मिळाला पाहिजे असे सांगीतले.
तसेच संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनांचा खऱ्या गरजूंना लाभ देण्यासाठी लवकरच तालुक्यात शिविर आयोजित करावे. आम आदमी विमा योजनांसह केंद्र सरकारच्या अन्य योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे, अपंग व्यक्तींना घरकुल योजनांचा लाभ देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले.
रोजगार हमी योजनेचे योग्य नियोजन करण्यात यावे असे निर्देश देऊन पालकमंत्री बडोले म्हणाले, या योजनेत मोठ्या प्रमाणात मजुरांना काम मिळण्यास मदत होणार असून विविध विकास कामे करता येईल. तालुक्यातील ग्रामपंचायतींनी रोजगार हमी योजनेच्या कामांची मागणी करावी. निसर्ग संपन्न असलेला सालेकसा तालुका पर्यटनाच्या बाबतीत दुर्लक्षीत आहे. भविष्यात तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास करुन जास्तीत जास्त रोजगार निर्मिती या क्षेत्रात होईल या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. तालुक्यातील अपूर्णावस्थेतील सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करुन जास्तीत-जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे.
गावपातळीवरील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी व्यक्तिश: लक्ष घालावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना दिले. आमदार पुराम म्हणाले, सालेकसा तालुक्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांचे बचतगट तयार करुन त्यांना उद्योग व्यवसायाकडे वळवावे, तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उत्तम राहावा यासाठी शिक्षकांनी परिश्रम घ्यावे.
गहाणे यांनी, या तालुक्यातील नागरिकांना व लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणांनी प्रभावीपणे काम करावे असे सांगीतले. आढावा बैढकीस उपविभागीय पोलिस अधिकारी दीपाली खन्ना, तहसीलदार प्रशांत सांगळे, गटविकास अधिकारी मोटघरे यांचेसह तालुकास्तरीय विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी, सरपंच यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)