रेल्वे स्थानकाच्या विकासात पडणार भर
By admin | Published: February 13, 2017 12:21 AM2017-02-13T00:21:27+5:302017-02-13T00:21:27+5:30
अनेक विकास कामांमुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापलट होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत.
फलाटांची वाढणार लांबी : नवीन वेटिंग हॉलसह अनेक सुविधा
गोंदिया : अनेक विकास कामांमुळे गोंदिया रेल्वेस्थानकाचा लवकरच कायापलट होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. होमप्लॅटफॉर्मवर नवीन शेडचे बांधकाम तर पूर्ण झालेच, आता लिफ्ट व एस्कलेटरच्या कामांनाही गती मिळाली आहे. शिवाय आता नवीन वेटिंग हॉलसह प्रवाशांच्या सुविधेसाठी अनेक विकास कामे केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
पूर्वी गाडीचे २४ कोच थांबू शकतील, एवढी लांबी फलाटांची होती. मात्र आता नव्याने सर्वच फलाटांची लांबी वाढविण्यात येणार आहे. गोंदिया रेल्वे स्थानकात २४ कोचऐवजी २६ कोच थांबू शकतील एवढी लांबी फलाटांची वाढविण्यात येणार आहे. फलाट-३ वर असलेल्या वेटिंग हॉलला मोठे करून त्याला पूर्णत: वाताणुकूलित करण्यात येणार असून क्लॉस-१ च्या प्रवाशांना त्याचा लाभ मिळणार आहे. तर येथेच आणखी एक नवीन वेटिंग हॉल बनणार असून त्याचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांना मिळणार आहे.
फलाट-१ वर दोन लघुशंका घर बनणार आहेत. तर फलाट-२ च्या लांबीकरणाचे कार्य सुरू आहे. फलाट-२, ५ व ६ वर वॉशेबल अप्रोनची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या दिशेने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शिवाय रेल्वे बोर्डाने गोंदियाच्या स्थानकावर किड्स झोन तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जागेचा शोध घेवून स्थळ निश्चित करण्याचे कार्य सुरू आहे. या किड्स झोनमध्ये प्रवासी आपल्या लहानमुलांना खेळण्यासाठी सोडून निश्चिंत राहू शकतील. तसेच नागपूर ते काचेवानीपर्यंतची स्थानके आॅटोमेटिक करण्यात आली आहेत. आता गोंदिया ते गुदमा आॅटोमेटिक करण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरून अधिक प्रवासी गाड्या धावू शकतील, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
गोंदियासाठी लोको मोटीव्ह इंजिनच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून ते कोठून प्राप्त केले जाईल, या दिशेने प्रयत्न केले जात आहे. नागपूरच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या होमप्लॅटफॉर्मवरून सुटण्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र अद्यापही त्या प्रक्रियेला सुरूवात झाली नाही. होमप्लॅटफॉर्मवर आणखी एक बाथरूमची सोय केली जात आहे. गोंदिया स्थानकाच्या फलाट-५ व ६ वर कँटिनची सोय करण्यात येणार आहे.
मागील वर्षी जून महिन्यात मंडळ रेल्वे व्यवस्थापक अमितकुमार अग्रवाल यांची सभा गोंदियाच्या रेल्वे व्यवस्थापक सभागृहात झाली होती. त्यात तिसऱ्या टॅ्रकबाबत त्यांनी माहिती दिली होती. ते म्हणाले होते की, गोंदियापर्यंत तिसऱ्या ट्रॅकचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.
मात्र आता फेब्रुवारी महिना सुरू असूनही तिसऱ्या ट्रॅकचे काम राजनांदगावपर्यंतच झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नियोजनानुसार कामात गती नसल्याचे म्हणता येईल. तिसऱ्या ट्रॅकचे काम पूर्ण झाले तर अधिक रेल्वेगाड्यांना योग्यरित्या संचालित करणे सोयीचे ठरेल.(प्रतिनिधी)