पांगोली नदीला प्रतीक्षा विकासाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:04 PM2017-09-18T22:04:22+5:302017-09-18T22:04:36+5:30
पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पांगोली नदीचे उगम गोरेगाव तालुक्यातील तेढा गावच्या सरोवरातून आहे. गोंदिया शहर पांगोली नदीकाठावर वसलेले आहे. गोंदिया तालुक्याच्या खातिया (कामठा) व मध्यप्रदेशच्या बालाघाट जिल्हा सीमेवर वाघ नदीत तिचे विलय होते. गोंदिया व गोरेगाव या दोन्ही तालुक्यातील शेतकरी पिकासाठी पांगोली नदीच्या पाण्यात अवलंबून असतात. हजारो शेतकरी कुटुंबांचे या पाण्यावर उदरनिर्वाह चालते. मात्र सद्यस्थितीत ही नदी प्रदूषणग्रस्त झाली असून तिचे अस्तित्वच संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यातील हजारो शेतकरी कुटुंबांवर भविष्यात संकट येवू शकते. पण शासनाचे याकडे दुर्लक्ष केले आहे.
पांगोली नदीच्या पुनरूत्थानासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेने पुढाकार घेत नदीचे निरीक्षण केले. यात त्यांना नदीचे पात्र उथळ होत चालले असून काठावरील गावात व शहरात पाण्याची पातळी सतत खालावत आहे. नदी पात्रातून अवैध रेती वाहतूक होत असून काठावरील वृक्षांच्या अवैध कत्तली होत आहेत. त्यामुळे नदीचे काठच नष्ट होत आहे.
काठावरील माती नदीत साचल्याने खोली कमी झाली. शिवाय शासनाने अद्यापही या नदीवर कुठेही बांध किंवा बंधारे बांधले नाही. त्यामुळे पाणी कुठेही अडविले जात नसून सरळ वाहून जाते व परिसरातील पाण्याच्या पातळीवर दुष्परिणाम होत आहे.
पांगोली नदी व सहायक नाल्यांवर दूषित पाण्याचे निर्जंतुकीकरण व सांडपाणी पुनर्वापर व्यवस्थापन प्रकल्पांची शासनाकडून उभारणी न करण्यात आल्याने पाणी पिण्यास अयोग्य ठरत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसह पाळीव पाण्यांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे काठावरील शेतपिकांना वर्षभर पाणी मिळत नाही. त्यामुळे फक्त खरीप हंगामातच केवळ धानपीक घेतले जाते. रबी किंवा उन्हाळी पीक फळभाज्या, पालेभाज्या, इतर नगदी पिके, कडधान्य व तृणधान्य घेण्याचे धाडसच शेतकरी करीत नाही. त्यामुळे आर्थिक स्थिती खालावून शेतकºयांमध्ये नैराश्य पसरत आहे. शिवाय शेतीकामे सोडून शेतकरी मोल-मजुरीच्या कामावर जाण्याचे प्रमाण वाढले आहे.
जलयुक्त शिवार योजनेतून विकास करा
पांगोली नदीचे पुनरूज्जीवन व विकास करण्यासाठी महाराष्टÑ शासनाची जलयुक्त शिवार योजना व महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत समावेश करून या योजनांद्वारे सदर नदीचा विकास आराखडा शासनस्तरावर तयार करून नदीचा विकास करावा. स्थानिक शेतमजुरांना स्थानिक ठिकाणीच रोजगार उपलब्ध होवू शकेल व गावाशेजारील नदी विकासात त्यांचाही सहभाग लाभेल, यासाठी नदी वाचविण्याचे प्रयत्न करावे. सदर नदी विकासासाठी शासनाकडून विशेष निधी मंजूर करून नदीचा विकास करावा किंवा नागपूरच्या नागनदीप्रमाणे विदेशी सहकार्यातून नदीचा विकास करावा.
पांगोली नदी वाचविण्यासाठी समाजोन्नती बहुउद्देशिय ग्रामीण व शहरी विकास संस्थेकडून सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. यासाठी संस्थेचे सक्रीय कार्यकर्ते तिर्थराज उके, जैयवंता उके, डिंपल उके, शेखर वाळवे, टेकचंद लाडे, संदेश भालाधरे, दिनेश फरकुंडे, गोपाल बनकर, सिठेश्वर नागरिकर, भोजू राऊत, उमेश मेश्राम, मुकेश उके, समीर मेश्राम नियमित प्रयत्न करीत आहेत.
स्मशानघाट, मंदिरे व निर्माल्यामुळे प्रदूषण
पांगोली नदीवर अनेक रहदारी पुले आहेत. त्यांच्या जवळच स्मशानघाट किंवा मंदिरे आहेत. मृतांचे अस्थिविसर्जन व मंदिरातील निर्माल्याचे विसर्जन नदी पात्रात होत असल्याने पाणी प्रदूषित होत आहे. शिवाय दरवर्षी श्रीकृष्ण, गौरी, शारदा, दुर्गा, गणपती, हार-फुले आदि विसर्जित केले जातात. देवी-देवतांच्या प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्या, प्लास्टिक पिशव्या व घनकचरा घालण्यात येत असल्याने पाणी प्रदूषित होते व गाळाचे प्रमाण वाढले आहे. मात्र शासनाचे उपसा करण्याकडे दुर्लक्ष आहे.
कारखाने व आरोग्यावर दुष्परिणाम
शहरातून वाहणाºया या नदीकाठावर व मिळणाºया नाल्यांकाठी राईस मिल्स, चामडे उद्योग, लाख कारखाने, टाईल्स कारखाने व प्रशासकीय मंजुरी असलेले इतर कारखाने आहेत. या कारखान्यांतून वाहणारे दूषित पाणी व राईस मिलच्या राखेमुळे नदी प्रदूषित होत आहे. त्या पाण्याचा वापर नागरिक व जनावरे करीत असल्याने त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. राईस मिलच्या चिमणीतून सतत निघणाºया धुरापासून वायू प्रदूषण होत आहे. शिवाय याच पाण्याचा वापर काठावरील शेतपिकासाठी होत असल्याने नापिकी वाढत आहे.
जिल्हास्तरावर कृती समिती गठित करा
पांगोली नदीचे संरक्षण, विकास व पुनरूज्जीवनाकडे शासन व प्रशासनाचे सारखेच दुर्लक्ष आहे. त्यामुळे तिचे अस्तित्त्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून परिसरातील शेती व शेतकरीसुद्धा नामशेष होत चालले. गोंदिया व गोरेगाव तालुके तसेच गोंदिया शहर पर्यावरणीय संतूलन बिघडत आहे. यासाठी जिल्हास्तरावर कृती समिती गठित करून पांगोलीसह जिल्हाभरातील सर्व नद्यांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संस्थेच्या वतीने करण्यात आलेले प्रयत्न
सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांना तीन वेळा निवेदन, जानेवारी २०१७ मध्ये संस्थासचिव उके यांच्या घरी भेटीदरम्यान या विषयावर निवेदन, छोटा गोंदिया येथे शेतकरी व नागरिकांसह चर्चा व निवेदन.
जिल्हाधिकारी यांना तसेच त्यांच्या वतीने मुख्यमंत्री, जलसिंचन मंत्री यांना दोन वेळा निवेदन व चर्चा. जिल्हाधिकारी कार्यालयातून शासनाकडे निवेदन गेले.
जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन व चर्चा. खा. नाना पटोले व राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना निवेदन.
आमदार गोपालदास अग्रवाल यांना निवेदन व शेतकºयांसह चर्चा. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्याशी चर्चा व निवेदन.
पांगोली नदीचा प्रवाह क्षेत्र
गोरेगाव तालुका : तेढा (तेढा तलावा उगम क्षेत्र), हलबीटोला (तेढा), तानुटोला (तिल्ली), महाजनटोला, तिल्ली (मोहगाव),
मोहगाव, चोपा, तेलनखेडी (सोनारटोला), घुमर्रा, कलपाथरी, कुणबीटोला (कलपाथरी), कमरगाव,
म्हसगाव, मुंडीपार, भडंगा (मुंडीपार), कमरगाव, बोटे, गोरेगाव (नगर पंचायत क्षेत्र), सर्वाटोला, झांजिया
हिरडामाली, मोहगाव (बु), तुमखेडा (बु) आदी गावे. (जवळपास २५ किमी क्षेत्र.)
गोंदिया तालुका : तुमखेडा खुर्द, कारंजा, फुलचूर, खमारी, छोटा गोंदिया (न.प. क्षेत्र), चुलोद, टेमनी, कटंगीकला, टेमनी,
नागरा, बरबसपुरा, अंभोरा, बटाणा, खातिया, मुंडीपार, अर्जुनी, बिरसी, कामठा, पांजरा, लंबाटोला,
कटंगटोला, कांद्री, छीपिया आदी गावे. (जवळपास ३० किमी क्षेत्र, छीपिया येथे पांगोली नदी महाराष्टÑ व
मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर वाघ नदीला मिळते.)
आमगाव तालुका : कातोर्ली, भोसा, घाटटेमनी आदी गावे. (जवळपास १५ किमी क्षेत्र.)