भक्तिमय झाली व्यापारनगरी
By admin | Published: April 16, 2016 01:12 AM2016-04-16T01:12:19+5:302016-04-16T01:12:19+5:30
‘रामजीकी निकली सवारी...’ या गाण्याच्या सुमधूर धूनवर शेकडो रामभक्तांच्या गर्दीत गोंदियात निघालेली शोभायात्रा गोंदियावासीयांच्या डोळ््यांचे पारणे फेडून गेली.
‘जय श्रीराम’चा जयघोष : भव्य शोभायात्रेतील विविध देखाव्यांचे आकर्षण
गोंदिया : ‘रामजीकी निकली सवारी...’ या गाण्याच्या सुमधूर धूनवर शेकडो रामभक्तांच्या गर्दीत गोंदियात निघालेली शोभायात्रा गोंदियावासीयांच्या डोळ््यांचे पारणे फेडून गेली. येथील श्रीराम जन्मोत्सव समितीच्यावतीने मंगळवारी (दि.८) रामजन्माचे निमित्त साधून ही शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत सहभागी रामभक्तांच्या सततच्या जयघोषाने अवघे शहर दणाणून गेले होते.
श्रीरामाच्या जन्मोत्सवानिमित्त गोंदिया शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
येथील रामनगरस्थित राम मंदिरातून सायंकाळी शोभायात्रा निघाली होती. प्रथम दुपारी मंदिरात राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर शहरवासीयांच्या दर्शनार्थ शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील आकर्षक देखावे तर डिजे व ढोल-ताशांच्या गजरात बेधूंद नाचत असलेली तरूणाई शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होती. रथात विराजीत श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमानाची आकर्षक मूर्ती शहरवासीयांच्या डोळ्यांचे पारणे फे डून घेणारी होती. ही शोभायात्रा रामनगर होत पाल चौक, उड्डाण पूल, नेहरू चौक, सिव्हील लाईन्स जयस्तंभ चौक, गांधी प्रतिमा होत निघाली.
शोभायात्रेत श्री राम जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल, भरत क्षत्रिय, बिपीन बावीसी, विजय बैस यांच्यासह समितीच्या अन्य पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येत तरूण व नागरिकांची उपस्थिती होती. याशिवाय चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी होते. या यात्रेत सहभागी नागरिकांसाठी शहरातील विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष व काही व्यक्तींकडून ठिकठिकाणी जलपानाची व्यवस्था केली होती. (शहर प्रतिनिधी)