मध्यप्रदेशातील धान आले जिल्ह्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2022 05:00 AM2022-07-10T05:00:00+5:302022-07-10T05:00:02+5:30
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्व १०७ खरेदी केंद्रांना खरेदीची मर्यादा ठरवून देत धान खरेदीचे आदेश दिले. ७ जुलैला दुपारी १२.४० वाजता धान खरेदीचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. त्यानंतर तासाभरातच हे पोर्टल ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याने बंद झाले. १ लाख क्विंटल धान खरेदीसाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत असताना एका तासाच धान खरेदी केंद्रावर ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी कशी झाली, असा प्रश्न शेतकरी आणि यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदी मर्यादा शासनाने वाढवून दिल्यानंतर ७ जुलैला एकाच दिवशी शासकीय धान खरेदी केंद्रावर ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आल्याची बाब पुढे आली. या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांकडील धान शिल्लक आहे मग खरेदी केंद्रावर नेमका कुणाचा धान खरेदी करण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला असता मध्यप्रदेशातून जिल्ह्यात हजारो क्विंटल धान शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आल्याची माहिती आहे.
जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला शासनाने रबीतील धान खरेदीची मर्यादा ४ लाख ४९ हजार क्विंटलने वाढवून दिली. यानंतर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्व १०७ खरेदी केंद्रांना खरेदीची मर्यादा ठरवून देत धान खरेदीचे आदेश दिले. ७ जुलैला दुपारी १२.४० वाजता धान खरेदीचे ऑनलाईन पोर्टल सुरू केले. त्यानंतर तासाभरातच हे पोर्टल ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याने बंद झाले. १ लाख क्विंटल धान खरेदीसाठी एक ते दोन दिवसांचा कालावधी लागत असताना एका तासाच धान खरेदी केंद्रावर ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी कशी झाली, असा प्रश्न शेतकरी आणि यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. १० हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री केल्याची नोंद ऑनलाइन पोर्टलवर झाली आहे.
मात्र ४५ धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांकडून धान खरेदी केल्याची बाब पुढे आली. सर्वाधिक घोळ सालेकसा तालुक्यातील केंद्रावर झाला आहे. लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांची ओरड वाढल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी याची चौकशी करण्यासाठी आठ चमू रवाना केल्या. या चमू दोन दिवसात सर्व केंद्रांना भेटी देऊन चौकशी अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहेत. काही चमुंना भेटी दरम्यान सालेकसा, आमगाव आणि गोंदिया तालुक्यातील धान खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातील धान मोठ्या प्रमाणात विक्रीस आल्याची माहिती आहे. त्या केंद्राची नाोसुद्धा पथकाला कळली असून त्याचा अहवाल ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार असल्याची माहिती आहे.
व्यापाऱ्यांकडून धान खरेदी शक्य
- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर धान खरेदी बंद करण्याचे निर्देश सर्व केंद्रांना दिले होते. पण यानंतरही सडक अर्जुनी तालुक्यातील दोन, तिरोडा तालुक्यातील एक आणि गोंदिया तालुक्यातील धान खरेदी सुरूच होती. धान खरेदीची मर्यादा वाढवून मिळाल्यास त्याच दिवशी या धानाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन या केंद्र संचालकांनी केले होते. त्यानुसारच ७ जुलै रोजीचा प्रकार घडला. पण हीच युक्ती आणखी केंद्र संचालकांनी वापरल्याने त्यांचे बिंग फुटल्याची माहिती आहे.
‘लोकमत’च्या वृत्ताची पुरवठा विभागाने घेतली दखल
- एकाच तासात ४ लाख ४९ हजार क्विंटल धान खरेदी झाल्याचे वृत्त लोकमतमध्ये शनिवारच्या (दि. ९) अंकात प्रसिद्ध होताच जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि धान खरेदी केंद्राच्या संचालकांमध्ये एकच खळबळ उडाली. दरम्यान या सर्व प्रकरणाची दखल अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेत याची चौकशी करून सोमवारी अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला दिले आहे.
‘त्या’ केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा
शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचे धान खरेदी करून शासन-प्रशासनाची दिशाभूल व फसवणूक करणाऱ्या त्या धान खरेदी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करून पुढे त्यांना धान खरेदीचे परवाने देऊ नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात
- शासकीय धान खरेदी केंद्र संचालकांना धान खरेदीसाठी मर्यादा ठरवून दिली होती. मग त्यांनी नियमांचे पालन न करता अतिरिक्त धान खरेदी कुठल्या आधारावर केली, एकाच तासात एवढ्या मोठ्या प्रमाणात धान खरेदी कशी केली अशा आशयाची नोटीस बजावण्यास मार्केटिंग फेडरेशनने सुरुवात केली आहे.