धापेवाड्याचे पाणी २०१९ पर्यंत मिळणार
By admin | Published: February 15, 2017 01:52 AM2017-02-15T01:52:55+5:302017-02-15T01:52:55+5:30
तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल,
गोंदिया : तिरोडा येथील धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या टप्पा २ चे काम पूर्ण करण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असून त्यानंतर बहुतांश शेतकऱ्यांना पाणी मिळू शकेल, अशी माहिती खासदार नाना पटोले यांनी सोमवारी गोंदियात पत्रकारांना दिली.
बालाघाट मार्गावरील त्यांच्या नवीन कार्यालयात आयोजित या पत्रपरिषदेत खा.पटोले यांनी धापेवाडा सिंचन प्रकल्प अनेक वर्षेपर्यंत रेंगाळण्यासाठी तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला. तत्कालीन सरकारने निधी दिला नाही म्हणून अदानीकडून निधी घेऊन प्रकल्पाचे काम मार्गी लावावे लागले, मात्र आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी मिळावे यासाठी आमचे सरकार प्रयत्नशिल आहे. प्रकल्पाच्या नियोजनानुसार सर्व तालुक्यांना नाही तर बऱ्याच शेतकऱ्यांना २०१९ पर्यंत धापेवाडाचे पाणी मिळेल, अशी माहिती खा.पटोले यांनी दिली.
जिल्हा नियोजन समितीकडून यावर्षी खूप कमी निधी खर्च झाला त्याबद्दल छेडले असता खा.पटोले म्हणाले, आचारसंहितेसोबत अधिकारीही यासाठी जबाबदार आहेत. त्यांनी घेतलेल्या जनता दरबाराता १५०० तक्रारी मिळाल्याची माहिती यावेळी दिली. त्या तक्रारींचा निपटारा करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकाऱ्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)