ढोलक बनले त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन
By admin | Published: April 20, 2015 01:02 AM2015-04-20T01:02:28+5:302015-04-20T01:02:28+5:30
ढोलकीवर थाप पडताच भल्याभल्यांचे पाय आपसूकच थिरकू लागतात.
देवानंद शहारे गोंदिया
ढोलकीवर थाप पडताच भल्याभल्यांचे पाय आपसूकच थिरकू लागतात. नवनवीन वाद्य विकसीत होत चालले तरिही ढोलकीच्या तालावर नाचण्याचा आनंद काही औरच आहे. हेच कारण आहे की, आजच्या युगातले नवनवे वाद्य जुन्या वाद्यांची सर करीत नाही. म्हणूणच जबलपूर येथील रहिवासी खान मोहम्मद यांचा ढोल तयार करण्याचा वडिलोपार्जीत व्यवसाय आजही सुरूच असून ढोलकचं त्यांच्या उदरनिर्वाहाने साधन बनले आहे.
कुटूंबात पत्नी व तीन मुले असलेले पस्तीशीच्या वयातील खान मध्यप्रदेशासह महाराष्ट्र व छत्तीसगढ या प्रांतात जावून जबलपूर येथे स्वत:च्या घरी तयार केलेले ढोलक विक्री करतात. कमीत कमी लहान-मोठे १२ ढोलक घेवून ते घरून निघतात. एकटेच मोठमोठ्या शहरात कमीत कमी तीन ते चार दिवस राहून ढोलक विक्री करून स्वगावी परततात. पुन्हा ढोलक तयार करून त्यांच्या विक्रीसाठी ते मोठ्या शहरात जातात हाच त्यांचा नित्यक्रम आहे.
सध्या खान मोहम्मद गोंदियात मुक्कामी असून दोन ढोलक विकल्यानंतर त्यांची बालाघाट येथे जाण्याची तयारी आहे. कमीत कमी दोन दिवस एका शहरात रहायचे व ढोलक विक्री करायचे. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुन्हा विक्रीसाठी त्या शहरात जायचे. ज्या शहरात ढोलक विक्रीला प्रतिसाद मिळत नाही, तिथे पुन्हा जात नसल्याचे खान यांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात ढोलक विक्री अधिक होत असून गणपती उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. पहिला वर्गही न शिकलेले खान अशिक्षीत असल्याची खंत व्यक्त करतात. ‘पढे लिखे होते तो धंदा बदल जाता’ असे सांगत मी अशिक्षित असलो तरी आपल्या पाल्यांना अशिक्षित ठेवणार नाही, हे त्यांचे शब्द मात्र प्रेरणा देणारे वाटत आहेत.