व्हॉट्सअँपची सेटिंग बदलली का ? पोस्ट टाकताना घ्यावी काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 04:43 PM2024-10-29T16:43:54+5:302024-10-29T16:46:28+5:30

विधानसभा निवडणूक : सायबर कक्षाचे पथक लक्ष ठेवून

Did the WhatsApp settings change? Be careful while posting | व्हॉट्सअँपची सेटिंग बदलली का ? पोस्ट टाकताना घ्यावी काळजी

Did the WhatsApp settings change? Be careful while posting

लोकमत न्यूज नेटवर्क 
गोंदिया :
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सोशल मीडियावर उमेदवारांचे कार्यकर्ते, समर्थकांमधून आरोप- प्रत्यारोपांच्या पोस्ट व्हायरल होण्याची शक्यता असते. यातून कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी सायबर पोलिसांचे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे.


व्हॉट्सअँपवर आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास पोस्ट टाकणाऱ्यासह ग्रुप व्हॉट्सअँपवरही कारवाई होऊ शकते. जिल्ह्यात चारही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यास प्रारंभ केला आहे. जिल्ह्याच्या हद्दीवर वाहनांची तपासणी केली जात असून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.


पोलिस प्रशासनाच्या वतीनेही चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, अजून अनेकांची उमेदवारी जाहीर झाली नाही. तरीही कार्यकर्ते, समर्थक आपल्याच पक्षाचा उमेदवार कसा सक्षम आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरून उमेदवारांविषयी चर्चा झडत आहेत. यातून आरोप-प्रत्यारोप होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा सायबर पोलिसांनी दिला आहे. यासाठी सायबर कक्षात स्वतंत्र पथकच नियुक्त करण्यात आले असून हे पथक सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहे. 


व्हॉट्सअँप ऍडमिनने काय काळजी घ्यावी ? 

  • व्हॉट्सअँप ग्रुप बनवताना प्रत्येक सदस्य हा सुजाण व विश्वासार्ह व्यक्ती आहे, याची खात्री करूनच त्याला ग्रुपमध्ये सदस्य करावे.
  • कोणत्याही सदस्यांनी आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, व्हिडीओ, दोन समाजात तेढ निर्माण होणारे साहित्य प्रसारित करू नये, अशा सूचना द्याव्यात.
  • सूचना देऊनही सदस्य आक्षेपार्ह मजकूर, पोस्ट, व्हिडीओ प्रसारित करीत असेल तर अशा सदस्यांची तक्रार जवळच्या पोलिस ठाण्यात करावी.
  • तसेच अशा सदस्याला ग्रुपमधून रिमूव्ह करावे.


...तर ग्रुप अॅडमिनवरही होईल कारवाई 
व्हॉट्सअँप, फेसबुक व इतर सोशल मीडियावर वादग्रस्त किंवा भावना दुखावणारे व्हिडीओ किवा फोटो टाकू नयेत. तसेच ग्रुप अॅडमिनने सुद्धा असे व्हिडीओ, फुटेज टाकणाऱ्यास ग्रुपमधून रिमूव्ह करावे. ही ग्रुप अॅडमिनची जबाबदारी राहील. अन्यथा वादग्रस्त व्हिडीओ प्रसारित करण्यास ग्रुप अॅडमिनची मूक संमती होती. असे गृहीत धरून ग्रुप अॅडमिनवर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. 


तीन वर्षांपर्यंत होऊ शकते शिक्षा 
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावतील अशा पोस्ट शेअर केल्यास अथवा लाईक, फॉरवर्ड केल्याचे सिद्ध झाल्यास ३ वर्षांपर्यंत शिक्षा व ५ लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. 


"जिल्ह्यात विधानसभा निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. त्या अनुषंगाने सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवले जात आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक आदी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, व्हिडीओ प्रसारित केल्याचे आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. सोशल मीडियाचा जपून वापर करावा." 
- गोरख भामरे, पोलिस अधीक्षक

Web Title: Did the WhatsApp settings change? Be careful while posting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.