रेशनकार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:42+5:302021-06-24T04:20:42+5:30
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात जवळपास दोन महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची ...
गोंदिया : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता राज्यात जवळपास दोन महिने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे उद्योगधंदे व रोजगाराची सर्वच साधने बंद होती. त्यामुळे हातावर आणून पानावर खाणाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. अनेकांचा रोजगार गेल्याने त्यांच्यासमोर दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने बीपीएल, अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना दोन महिने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. या अंतर्गत जिल्ह्यात मे आणि जून महिन्यात एकूण २ लाख २२ हजार शिधापत्रिकाधारकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनेंतर्गत मोफत धान्याचे वाटप करण्यात आले. अनेकांच्या घरची चूल पेटण्यास मदत झाली. या अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना २० किलो तांदूळ आणि १० किलो गहू तर केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत ५ किलो तांदूळ आणि ३ किलो गहू वाटप करण्यात आले. जिल्हा पुरवठा विभागाकडे धान्यसाठा उपलब्ध असल्याने मे आणि जून या महिन्यातील स्वस्त धान्याचे त्याच महिन्यात वाटप करण्यात आले. यामुळे शिधापत्रिकाधारकांनासुद्धा बरीच मदत झाली.
..............
कुटुंबाचा गाडा चालविण्यास झाली मदत
कोरोनामुळे रोजगाराची साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे अनेकांच्या पुढे दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता. तर रोजगाराअभावी कुटुंबाचा गाडा पुढे खेचण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना दोन महिने मोफत धान्य उपलब्ध करून दिल्याने मोठी मदत झाली. दोन्ही महिन्यांचे मोफत धान्य मला मिळाले.
- रमेश नागोसे, कुणबीटोला
................
केंद्र व राज्य सरकारने मे आणि जून महिन्यात अंत्योदय आणि बीपीएल शिधापत्रिकाधारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. या दोन्ही महिन्यांचे धान्य आम्हाला मिळाले. कोरोना संकट काळात मोठी मदत झाली. दोन्ही योजनेंतर्गत महिन्याकाठी ३५ किलो धान्य मिळाल्याने रोजगार नसताना कुटुंबाला आधार झाला.
- अमृता उईके, मुरकुडोह
....................
गोंदिया जिल्ह्यातील एकूण २ लाख २२ हजार शिधापत्रिकाधारकांना दोन्ही महिन्यांचे धान्य त्या त्या महिन्यात वाटप करण्यात आले. तसे निर्देशसुद्धा स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आले होते. धान्य प्राप्त न झाल्याची एकही तक्रार नाही.
- देवीदास वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी.
..............
धान्य घेतल्यानंतर अंगठा लावा
- स्वस्त धान्य दुकानातून स्वस्त धान्याची उचल केल्यानंतर ई-पास मशीनवर अंगठा लावा.
- धान्य उचल करताना किती धान्य मिळाले याची पावती घेण्यास विसरू नका.
- शासनाने प्रति शिधापत्रिकाधारकांना ठरवून दिलेल्या नियमानुसार धान्य मिळत आहे किंवा नाही याची खात्री करा.
............
एकूण शिधापत्रिकाधारक : २२२४४७
बीपीएल : ७८५१८
अंत्योदय : ७४५६७
केशरी : ४४३१२
.........................