डिझेल दरवाढीने महागाईचे चटके बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2022 05:00 AM2022-04-02T05:00:00+5:302022-04-02T05:00:13+5:30
विशेष म्हणजे, डिझेलच्या दरावरच अन्य वस्तूंचे दर अवलंबून असतात. कारण डिझेलचे दर वधारल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वधारणार असून त्यानंतर सर्वच वस्तूंचे दर वधारणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फसगत होणार असतानाच मालवाहतूक करणारे ही यापासून सुटलेले नाहीत. वाढीव भाडे मिळत नसल्याने त्यांना जुन्याच भाड्यावर गाड्या चालवाव्या लागत आहेत. परिणामी हाती येणाऱ्या मिळकतीवर डिझेल दरवाढीने डल्ला मारला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रशिया व युक्रेनमधील युद्धाच्या झळा आता बसू लागल्या असून त्याची सुरुवात खाद्यतेल व किराणामालानंतर आता पेट्रोल-डिझेल दरवाढीतून बघावयास मिळत आहे. दिवाळीपासून नियंत्रणात असलेले पेट्रोल-डिझेलचे दर आता एका झटक्यात वधारले असून सर्वसामान्यांची फसगत झाली आहे. विशेष म्हणजे, डिझेलच्या दरावरच अन्य वस्तूंचे दर अवलंबून असतात. कारण डिझेलचे दर वधारल्यामुळे मालवाहतुकीचेही दर वधारणार असून त्यानंतर सर्वच वस्तूंचे दर वधारणार आहे. विशेष म्हणजे, या दरवाढीमुळे सर्वसामान्यांची फसगत होणार असतानाच मालवाहतूक करणारे ही यापासून सुटलेले नाहीत. वाढीव भाडे मिळत नसल्याने त्यांना जुन्याच भाड्यावर गाड्या चालवाव्या लागत आहेत. परिणामी हाती येणाऱ्या मिळकतीवर डिझेल दरवाढीने डल्ला मारला आहे.
आठवडाभरात डिझेलमध्ये ४ रुपयांची वाढ
सध्या डिझेलची दरवाढ दररोज होत असून त्यात एका आठवड्यात डिझेल ४ रुपयांनी बधारल्याचे दिसत आहे. २५ मार्च रोजी डिझेलचे दर ९६.२६ एवढे होते. तर १ एप्रिल रोजी डिझेलचे दर वधारून १००.३६ रुपये झाले. म्हणजेच ४ रुपयांची दरवाढ दिसून येत आहे.
विमा महागला
पेट्रोल-डिझेलचे दर वधारत चालले असतानाच शासनाने वाहन विम्याचे दर भरमसाट वाढवून दिले आहेत. त्यात अधिकची भर म्हणजे १ एप्रिलपासून त्यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती आहे.
वर्षभरात डिझेल १० रुपयांनी महागले
डिझेलची दरवाढ मागील वर्षभरापासून सातत्याने सुरूच आहे. १ एप्रिल २०२१ रोजी डिझेल जर ९०.६२ रुपये होते. तेच १ एप्रिल २०२२ रोजी १००.३६ रुपये झाले आहे. म्हणजेच वर्षभरात १० रुपयांची दरवाढ झाली आहे.
डिझेलचे दर दररोज वाढत चालले असून आम्हाला मात्र वाढीव भाडे मिळत नसल्याने जुन्याच भाड्यावर गाडी चालवावी लागत आहे. परिणामी आम्हाला मिळणाऱा नफाही हातून जात आहे. डिझेलची अशीच दरवाढ होत राहिल्यास आम्हाला गाडी चालविणे आणखी कठीण होणार असून भाडे वाढवावेच लागतील.
- सुनील धवने, अध्यक्ष, मालधक्का लोकल ट्रक असोसिएशन, गोंदिया
भाववाढीमुळे गणिते बिघडली
डिझेलचे दर वाढत असतानाच आता विमा व फिटनेसचे दर वाढणार आहेत. मात्र भाडे वाढविता येत नसल्याने आमची फसगत होत आहे. आता गाडी चालविणे कठीण होत असून भाडे वाढविण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
- उमेश शिरगरे (ट्रक चालक-मालक)
डिझेलचे दर वाढले असूनही भाडे वाढ करता आली नाही. परिणामी आम्हाला आता गाडी चालविणे कठीण होत आहे. डिझेलची दरवाढ होत राहिल्यास भाडे वाढवावे लागतील व परिणामी महागाई वाढेल.
- किशोर शेंडे (ट्रकचालक)