गुप्तधनासाठी जंगलात खोदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2016 02:02 AM2016-09-23T02:02:56+5:302016-09-23T02:02:56+5:30
नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक १० इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारला पकडले.
१० आरोपींना अटक : नवेगावच्या राखीव वनात गस्तीपथकाची कारवाई
अर्जुनी मोरगाव : नवेगावबांध व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात बोदराईनजीक १० इसमांना नवेगावबांध वनविभागाच्या गस्ती पथकाने मंगळवारला पकडले. या आरोपींनी अनधिकृत प्रवेश केला. मात्र वन्य प्राण्यांची शिकार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, की गुप्तधनाचा शोध याचा तपास सुरू आहे.
याप्रकरणी वनविभागाने त्या १० आरोपींना अटक केली. गुरुवारी यापैकी ६ आरोपींची जमानतीवर सुटका केली तर ४ आरोपींची भंडारा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
वनविभागाच्या गस्ती पथकाची जांभळी प्रवेशक्षेत्र ते बोदराई परिसरात मंगळवारी (दि.२०) गस्त सुरू होती. देवदास भिक्षू जनबंधू रा.रामपुरी, निकेश रामचंद्र गजबे रा.भुरसीटोला, करण शालीकराम गजबे रा.पिंडकेपार साकोली, विनोद मनोहर सावसाकडे रा.तिर्री (अड्याळ), किसनराव प्रभाकर टेंभरे रा.हौशंगाबाद (मध्यप्रदेश), मनोजकुमार भीमराव घोरमारे रा.मालेगाव भंडारा, कुंदन मेश्राम, शालीकराम गजबे, ज्ञानेश्वर विश्वनाथ वैद्य व उमेश गजबे सर्व रा.बिडटोला यांनी मंगळवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास बोदराई परिसरात प्रवेश केला. याचवेळी गस्तीपथक तिथे जाऊन धडकले.
घनदाट जंगलात हे लोक खड्डा खोदण्याचे काम करीत होते. वनकर्मचाऱ्यांना बघून पाच आरोपी पळाले तर पाच आरोपी घटनास्थळावर सापडले. या पाच आरोपींना मंगळवारी अटक करुन बुधवारला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना दोन दिवसांची वनकोठडी मंजूर केलीहोती. बुधवारला पसार झालेल्या पाच आरोपींना अटक करुन गुरुवारला (दि.२२) न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्व आरोपींवर शस्त्रांसह वनकायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. आरोपीतर्फे अॅड.मोहन भाजीपाले तर वन विभागातर्फे अॅड.राजेश पालीवाल यांनी युक्तीवाद केला. (तालुका प्रतिनिधी)
मध्यप्रदेशच्या हौशंगाबादचा महाराज
जादूटोण्याद्वारे सुमारे दोन कोटी रुपयांचे गुप्तधन काढतो, अशी बतावणी करुन खड्डे खोदण्याचे काम सुरु होते. यासाठी हौशंगाबाद (मध्यप्रदेश)चे किसनराव टेंभरे या महाराजाला पाचारण केले होते. घटनास्थळी दीड बाय दीड फुटाचा खोल खड्डा होता. सभोवताल भगवे झेंडे, जमिनीची देवपूजा, कापलेले निंबू आढळून आले.