आदिवासी, नक्षलग्रस्त भागात डिजीटल ई-लर्निंग स्कूल
By admin | Published: March 2, 2016 02:13 AM2016-03-02T02:13:30+5:302016-03-02T02:13:30+5:30
तालुका मुख्यालय देवरीपासून काही अंतरावर दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असलेले, पूर्णत: आदिवासी समाजाचे वास्तव्य असणारे जेठभावडा हे गाव आता चर्चेत आले आहे ...
जिल्हा परिषदेची शाळा : खासदारांनी केले आधुनिक उपकरणांचे उद्घाटन
गोंदिया : तालुका मुख्यालय देवरीपासून काही अंतरावर दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात असलेले, पूर्णत: आदिवासी समाजाचे वास्तव्य असणारे जेठभावडा हे गाव आता चर्चेत आले आहे ते येथील शाळेमुळे. एखाद्या शहरी भागातील आधुनिक सुविधायुक्त शाळेला लाजवेल असा तामझाम या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेचा आहे. दुर्गम भागात असणाऱ्या शाळांमध्ये पहिली डिजीटल शाळा होण्याचा बहुमान या शाळेने पटकावला आहे.
ज्या गावाला जाण्यासाठी बसची अथवा इतर कोणत्याही साधनाची सोय नाही, त्या गावची शाळा आज ई-लर्निंग स्कूल म्हणजेच पूर्णत: आधुनिक संगणकीय तंत्रज्ञानयुक्त (डिजीटल) शाळा झाली आहे. सोमवारी (दि. २८) ला या शाळेतील डिजीटलायझेशनचे उद्घाटन खा.अशोक नेते यांच्या हस्ते, जि.प.चे शिक्षण सभापती पी.जी.कटरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे, आ.संजय पुराम, प्रमुख अतिथी म्हणून उषा शहारे, उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी, तहसीलदार संजय नागटिळक आदी उपस्थित होते.
आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या स्थानिक विकास निधीतून या शाळेत विविध साहित्य पुरविण्यात आले. डिजीटल शाळेच्या उद्घाटनासोबत लोकसहभागातून निर्मित बालोद्यानाचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते यांनी या विकासात्मक उपक्रमामुळे अतिसंवेदनशिल व आदिवासी भागात राहात असणारे विद्यार्थी नक्की प्रगत होतील, अशी आशा व्यक्त केली. आमदार पुराम म्हणाले, आज विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या हेतुने टॅब वितरीत करून एक वेगळा आनंद मिळत आहे.
कार्यक्रमाला देवरीचे नगरसेवक यादोराव पंचमवार, प्रवीण दहीकर, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश लदरे, लक्ष्मण आंधळे, एल.यू.खोब्रागडे, पं.स.सदस्य लखनी सलामे, मुख्याध्यापक रामप्रसाद मस्के, मोरेश्वर गावडकर, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डी.सी.दिघोरे, केंद्रप्रमुख जि.एम.वैद्य, सामाजिक कार्यकर्ता कुलदीप लांजेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रास्ताविक सरपंच डॉ.रहांगडाले, संचालन चेतन उईके तर आभार मुख्याध्यापक किशोर गर्जे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सचिव बंसोड व समस्त गावकरी तथा शिक्षकांनी प्रयत्न केले.(जिल्हा प्रतिनिधी)