डिजिटल साहित्य धूळ खात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 09:44 PM2017-10-08T21:44:32+5:302017-10-08T21:44:46+5:30
सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणारी येथील जिल्हा परिषद शाळा ३० डिसेंबर २०१६ रोजी डिजिटल करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येणारी येथील जिल्हा परिषद शाळा ३० डिसेंबर २०१६ रोजी डिजिटल करण्यात आली होती. मात्र हे डिजिटल सयंत्र बंद पडून असल्यामुळे त्यांचा विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचा लाभ झाला नाही. लोकवर्गणीतून घेण्यात आलेले हे डिजिटल संच धूळ खात पडून असल्याने वर्गणीचे पैसे परत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक शाळा डिजिटल करुन त्या माध्यमाने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देता येईल, असा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. त्यासाठी वरच्या स्तरापासून खालच्या स्तरापर्यंतचे कर्मचारी ही मोहीम राबविण्यात व्यस्त होते. जिल्ह्यातील बहुतांश शाळांचे डिजिटल यंत्र धूळ खात पडून असल्याची माहिती आहे. त्यात येथील जिल्हा परिषद शाळाही मागे नाही. शासन योजना राबविते, परंतु त्याचे परिणाम मात्र यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे कसे मिळतील, अशी समस्या उभी ठाकली आहे.
याच शाळेतील शिक्षक व शाळा व्यवस्थापन समितीने पुढाकार घेवून लोकवर्गणी गोळा केली. यामध्ये शिक्षकांचाही सहभाग होता. त्याच लोकवर्गणीच्या पैशाने विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी डिजिटल यंत्र खरेदी करण्यात आले. सदर यंत्र दोन-चार महिने चालून बंद पडले. त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नाही. यंत्र बंद पडल्यापासून आतापर्यंत त्यांची सुधारणा करण्यात आली नाही. तसेच ते सुरू करून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाचे धडे कसे दिले जातील, याबाबत सद्यस्थितीत कुणीही पुढाकार घेतल्याचे दिसून येत नाही.
डिजिटल शिक्षणाचा उद्देश समोर ठेवून गावकºयांनी सरळ हाताने वर्गणी दिली होती. मात्र डिजिटल यंत्रच बंद पडून धूळ खात पडले असतील तर जमा केलेली वर्गणी परत करण्यात यावी, असे जितेश मानवटकर व कोमल दामले यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.