विद्यार्थ्यांनाही डिजिटल करा
By admin | Published: May 6, 2017 12:55 AM2017-05-06T00:55:30+5:302017-05-06T00:55:30+5:30
डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे.
विजय रहांगडाले : प्रवेशद्वारे व मूर्ती लोकार्पण कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : डिजिटल इंडिया संकल्पनेतून सध्या ई-सुविधेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत आहे. यामध्ये शाळांचासुद्धा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात बहुतांश शाळा डिजिटल झालेल्या आहेत. परंतु नुसती शाळा डिजिटल होणे गरजेचे नसून त्याबरोबर विद्यार्थीसुद्धा डिजिटल होणे आवश्यक आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाला संगणक हाताळता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आ. विजय रहांगडाले यांनी केले. तलुक्यातील ग्राम मुंडीपार येथे प्रवेशद्वार व शारदादेवीच्या मूर्ती लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
पुढे बोलताना आमदार रहांगडाले यांनी, ई लर्निंगमुळे विद्यार्थी व शिक्षकांच्या वेळेची बचत होते. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याची संकल्पना पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. याकरिता प्रत्येक शिक्षकाने आपल्या अध्यापन कार्यात संगणकाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचा वापर करावा. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाविषयी अभिरुची निर्माण करावी असे मत व्यक्त केले. माजी आमदार भजनदास वैद्य यांनी, मराठी ही आपली मातृभाषा असून मराठी भाषेची अस्मिता टिकवून ठेवण्याकरिता विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रवेशद्वार व मूर्ती दानदाते सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष मुन्नीलाल चौधरी, माजी आमदार भजनदास वैद्य, कृउबास मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, प्रशासक डॉ. वसंत भगत, पं.स. सदस्य डॉ.बी.एस. रहांगडाले, गटशिक्षणाधिकारी मानकर, विस्तार अधिकारी समरीत, माजी संचालक प्रभा घरजारे, सरपंच शीला साठवणे, उपसरपंच आनंद उके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबुलाल चौधरी, पोलीस पाटील साठवणे, भाजप महामंत्री डिलेश पारधी, ग्रा.पं. सदस्य सेलोकर, गजभिये, मुख्याध्यापक मनोहर पटले व मोठ्या संख्येने गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते. संचालन आर.पी. भगत यांनी केले. आभार यू.जे. पारधी यांनी मानले.