उखडलेल्या रस्त्यांमुळे एक फेरी बंद व एकीचा मार्ग बदलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:35 AM2021-09-07T04:35:08+5:302021-09-07T04:35:08+5:30
कपिल केकत गोंदिया : जिल्ह्याला उखडलेल्या रस्त्यांचे ग्रहण लागले आहे यात शंका नाही. त्यात पावसाळ्यात रस्त्यांची जास्तच चाळण होत ...
कपिल केकत
गोंदिया : जिल्ह्याला उखडलेल्या रस्त्यांचे ग्रहण लागले आहे यात शंका नाही. त्यात पावसाळ्यात रस्त्यांची जास्तच चाळण होत असून, वाहतूक करणे धोकादायक असते. हा धोका दुचाकी व चारचाकी वाहनांपुरताच मर्यादित राहत कित्येकदा एसटीलाही उखडलेल्या व खराब झालेल्या रस्त्यांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो. रस्ते खराब झाल्यास एसटी जात नसल्याने त्या मार्गावरील फेरी बंद करावी लागते. अशात अन्य मार्ग असल्यास मार्ग वळवून एसटी सोडावी लागते. जिल्ह्यातही रस्त्यांमुळे आगारांवर ही पाळी येते. मात्र यंदा गोंदिया आगाराला खराब रस्त्यामुळे फक्त एकच फेरी बंद करावी लागली असून, एक फेरी मार्ग बदलून सोडावी लागत आहे तर तिरोडा आगारावर मात्र अद्याप अशी पाळी आलेली नाही.
--
आगार आणि सुरू असलेल्या बसेस
गोंदिया - ५७
तिरोडा - ३६
---------------------------
या मार्गांवरील फेऱ्या बंद
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे हाल झाले असून, नागरिकांना वाहतुकीला त्रास सहन करावा लागत आहे. एसटीलासुद्धा ही समस्या जाणवत असून, यातूनच आगाराने सालेकसा तालुक्यातील डोमाटोला- बिजेपार ही बस बंद करावी लागली आहे. येथे जाण्यासाठी अन्य मार्ग नसल्याने बस बंद करणे हाच मार्ग होता.
----
हे मार्ग वळविले
आगाराला खराब रस्त्यांमुळे एक बस बंद करावी लागली असतानाच गोरेगाव तालुक्यातील कालीमाती-लिंबा ही फेरी बंद करावी लागली. मात्र लिंबा जाण्यासाठी आता मुंडीपार मार्गाने बस सोडली जात आहे. ही एकच बस मार्ग बदलवून जिल्ह्यात चालविली जात आहे.
---------------------------------
एसटीचा खर्च वाढला
खराब रस्त्यांमुळे कित्येकदा गाड्यांचे टायर पंक्चर होतात, फाटतात व त्यामुळे नुकसान होते. याशिवाय गाड्यांमध्ये अन्य तक्रारीही वाढतात. अशात जड वाहनांच्या दुरुस्तीसाठी चांगलाच खर्च येतो यात शंका नाही. मात्र एसटी आगारातच दुरुस्तीसाठी विशेष विभाग असल्याने एसटीची तेथेच दुरुस्ती केली जाते. शिवाय, मोठ्या प्रमाणाता दुरुस्तीची गरज असल्यास एसटी विभागीय कार्यालयाकडे पाठविल्या जातात.
------------------
तेवढा त्रास नाही
यंदा पाऊस तेवढा पडला नसल्याने रस्त्यांची समस्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात जाणवली नाही. फक्त एकच गाडी बंद करावी लागली असून, एक गाडी रस्ता बदलून चालवावी लागत आहे. कोरोनामुळे ग्रामीण भागातील फेऱ्या तशाही कमी कराव्या लागल्या आहेत.
- संजना पटले
आगारप्रमुख, गोंदिया