दिलासा ... सहा तालुके झाले कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:32 AM2021-08-27T04:32:00+5:302021-08-27T04:32:00+5:30
गोंदिया : कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनवर आली असून, आठपैकी सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने ...
गोंदिया : कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दोनवर आली असून, आठपैकी सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असून आठवडभरात जिल्हा पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे ही निश्चित जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने गुरुवारी (दि.२६) ४९२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी ४३८ नमुन्यांची आरटीपीसीआर तर ५४ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात एकही नमुना कोरोनाबाधित आढळला नाही. परिणामी कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट शून्य होता. कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने घट होत असून, कोरोनाचे हॉटस्पॉट समजले जाणारे तालुके आता पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. सद्य:स्थितीत गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, सडक अर्जुनी, देवरी, अर्जुनी मोरगाव हे सहा तालुके पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत, तर आमगाव आणि सालेकसा तालुक्यात प्रत्येकी एक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे हे दोन तालुकेसुध्दा लवकरच कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे. कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत ४,४५,३५४ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २,२६,३६९ आरटीपीसीआर तर २,१८,९६५ नमुन्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. यापैकी ४१,१९९ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले. ४०,४९४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
.......
लसीकरणाची साडेसात लाखांकडे वाटचाल
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला आता नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती वाढली आहे. जिल्ह्यातील ९० लसीकरण केंद्रांवरून सध्या लसीकरण मोहीम सुरू असून, आतापर्यंत ७ लाख ३९ हजार ७५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाची टक्केवारी आता ५५ टक्क्यांवर गेली आहे.
.................
चाचण्यांचे प्रमाण झाले कमी
कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आल्याने कोरोना चाचण्यांचे प्रमाणसुध्दा कमी झाले आहे. जिल्ह्यात सध्या दररोज पाचशे चाचण्या केल्या जात आहेत.