कुटुंबीयच निघाले दिनेशचे मारेकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 01:08 AM2018-11-18T01:08:04+5:302018-11-18T01:08:28+5:30

संपत्तीचा हव्यास व दारु प्राशन केल्यानंतर होणारी सततची कटकट या कारणावरुन आई, भाऊ व बहिणीने दिनेशची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

Dinesh's killer kills family | कुटुंबीयच निघाले दिनेशचे मारेकरी

कुटुंबीयच निघाले दिनेशचे मारेकरी

Next
ठळक मुद्देआई, बहीण व भावाने केली गळा आवळून हत्या : आठ तासात प्रकरणाचा छडा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : संपत्तीचा हव्यास व दारु प्राशन केल्यानंतर होणारी सततची कटकट या कारणावरुन आई, भाऊ व बहिणीने दिनेशची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
या हत्या प्रकरणाचा उलगडा अवघ्या आठ तासात लावला. अर्जुनी-मोरगाव येथील दिनेश मारोती पुस्तोडे (३०) याचा शुक्रवारी (दि.१६) सकाळी अर्जुनी-मोरगाव-वडसा राज्य महामार्गानजीकच्या खापरी रस्त्यावर मृतदेह आढळला. त्यांच्या डोक्यावर जखम व नाकातून रक्तस्त्राव आणि पायाचा अंगठा खरचटलेला होता. दिनेशची हत्या झाली असावी या दिशेने अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान देवरीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले यांनी घटनास्थळाला भेट दिली.
गोंदिया येथून श्वान पथक व ठसे मुद्रा तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वान हा अर्जुनी-मोरगाव-वडसा राज्य महामार्गावरील राजन पालीवाल यांच्या गॅरेजपर्यंत पोहचला. मात्र तो पुढे गेला नाही. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी उपअधीक्षक ढोले हे तळ ठोकून होते. त्यांनी तपासाची चक्रे फिरविली. मृतकाचा भाऊ मनोज हा उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. संशयावरुन मनोजला ताब्यात घेण्यात आले. त्यात अनेक माहिती उघड झाली. मृतक दिनेश हा दारुचा व्यसनांध होता. तो नेहमीच दारु प्राशन करायचा. भाऊ मनोज हा दिल्ली येथे आर्मीमध्ये नोकरीवर आहे. तर अर्जुनी-मोरगाव येथे आई व मृतक दिनेश हे वेगवेगळे राहायचे. मृतक दिनेशची पहिली पत्नी निघून गेली. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले. मात्र ही पत्नी सुध्दा महिनाभर पूर्वीपासून दारुच्या त्रासाला कंटाळून निघून गेली होती.
दारुच्या नशेत दिनेश नेहमी आईला त्रास द्यायचा. तो दारुचा शौक पूर्ण करण्यासाठी प्रसंगी घरातील साहित्य विकायचा. याच त्रासाला कंटाळून दिनेशची हत्या केल्याचे तपासात पुढे आले. अखेर पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा उलगडा केला.
या प्रकरणी भाऊ मनोज मारोती पुस्तोडे (३८),आई अनुसया मारोती पुस्तोडे (६०) व बहिण उर्मिला भरत कापगते (४०) श्रीनगर कॉलोनी साकोली यांचेविरुध्द कलम ३०२, २०१, १२० ब, १०९ भादंविचा गुन्हा नोंदविला. तिघांनाही अटक करण्यात आली आहे.
देवरीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक एस.एस.कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे, शिपाई दिपक खांडेकर हे तपास करीत आहेत.
ब्रह्मपुरीत शिजला हत्येचा कट
मृतकाचा भाऊ मनोज हा दिल्ली येथे सैन्यामध्ये नोकरीला आहे. त्याचे ब्रम्हपुरी येथे घर आहे. तो दिवाळीनिमित्त गावाकडे आला होता. तर बहिण उर्मिला ही साकोली येथील रहिवासी असून ती एका खासगी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षिका आहे. ती सुध्दा दिवाळीनिमित्त भावाकडे आली होती. तिन्ही आरोपींनी मृतक दिनेशला संपविण्याचा कट ब्रम्हपुरी येथे रचला होता. शिजलेल्या कटाप्रमाणेच त्यांनी दिनेशला जिवानिशी ठार केले.
अशी लावली मृतदेहाची विल्हेवाट
पुस्तोडे कुटूंबियांची अर्जुनी-मोरगाव-वडसा राज्य महामार्गाला लागून शेतजमिन आहे. व्यसनामुळे उद्भवणारी सततची कटकट व संपत्तीच्या कारणावरुन दिनेशला संपविण्याचे षंडयंत्र रचण्यात आले. तो गुरुवारी (दि.१५) रात्री दारु प्राशन करुन झोपी गेला होता. आरोपींनी त्यांच्या तोंडावर उशीचा दाब दिला. त्याचे डोके व तोंडावर मारहाण केली व दोरीने त्याचा गळा आवळला. दिनेश हा मृत झाल्याची खात्री पटल्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरले. यासाठी दुचाकीचा वापर करण्यात आला. मृतकाचा भाऊ मनोज हा दुचाकी चालवित होता. मधात दिनेशचे प्रेत बहिण उर्मिला ही पाठीमागे बसली होती. त्यांनी हॉटेल मोरया समोरील खापरी रस्त्यावर कडेला मृतदेह टाकला. मृतदेहाच्या बाजूला मृतकाची चप्पल होती. प्रेताची विल्हेवाट लावल्यानंतर मनोज व उर्मिला हे ब्रम्हपुरीला निघून गेले.
मनोजच्या हावभावावरुन वाढला संशय
शुक्रवारी (दि.१६) सकाळी खापरी मार्गाने येणाऱ्यांना काही नागरिकांना दिनेशचा मृतदेह आढळला. याची अर्जुनी-मोरगाव पोलिसांना सूचना देण्यात आली. पोलिसांनी दिनेशच्या मृत्युची सूचना मनोजला दिली. मनोज ब्रम्हपुरीवरुन सकाळी आला व तो दिनेशच्या मृतदेहाजवळ तो मी नव्हेच या अविर्भावत वावरत होता, मात्र पोलिसांची नजर त्यांच्या हावभावावर होती. त्याच्या हावभावावरुन पोलिसांचा संशय बळावला.

Web Title: Dinesh's killer kills family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.