रेवचंदच्या पीएम रिपोर्टवरूनच ठरेल तपासाची दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:32 AM2021-09-23T04:32:49+5:302021-09-23T04:32:49+5:30
गोंदिया : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२१) सकाळी उघडकीस ...
गोंदिया : तिरोडा तालुक्यात येणाऱ्या चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.२१) सकाळी उघडकीस आली. रेवचंद डोंगरू बिसेन (५१), त्यांची पत्नी मालता रेवचंद्र बिसेन (४५), मुलगी पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०) व मुलगा तेजस रेवचंद बिसेन (१७) या चौघांचा खून करण्यात आला. या घटनेला ३५ तास उलटले असतानाही पोलीस आरोपीपर्यंत पोहचू शकले नाही. या गुन्ह्याच्या तपासासाठी पाच चमू गठित करण्यात आले आहे. हे चमू परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
रेवचंद डोंगरू बिसेन यांच्याकडे ३ मेटॅडोअर व एक ट्रॅक्टर असून, ते रेशनचे धान्य ट्रान्स्पोर्ट करण्याचे काम करीत होते. मंगळवारी (दि.२१) पहाटे बिसेन यांच्या घरात अज्ञात मारेकऱ्यांनी प्रवेश करून साखरझोपेत असलेल्या सदस्यांवर ट्रॅक्टरच्या स्पेंडलने डोक्यावर वार करून ठार केले. मालता बिसेन, पौर्णिमा बिसेन व तेजस बिसेन (१७) हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर रेवचंद बिसेन यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून होता. गळफास लावलेला दोर दारातून खिडकीला बांधून ठेवला होता. चौघांपैकी तिघांचा खून; परंतु रेवचंदची हत्या की आत्महत्या या दोन्ही बाजूने आता तपासाला सुरुवात झाली आहे; परंतु मृतदेहांची उत्तरीय तपासणी अहवाल आल्यावर पोलिसांच्या तपासाला सुरुवात होणार आहे. रेवचंदच्या मृत्यूचा अहवाल या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. कांचन रहांगडाले यांनी या प्रकरणातील मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली. त्यांचा व्हिसेरा उत्तरीय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. तिघांचा खून झाला; परंतु रेवचंदचा खून झाला की त्याने आत्महत्या केली, या दिशेने तपास करण्यासाठी पोलीस रेवचंदच्या उत्तरीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत. आता तपासाला सुरुवात झाली; परंतु व्हिसेरा रिपोर्ट आल्यावर पोलिसांची तपासाची खरी दिशा ठरेल. आतापर्यंत उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला नाही, असे तिरोडाचे ठाणेदार योगेश पारधी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
.............
या पाच चमूंचा समावेश
चुरडी हत्याकांडाच्या तपासासाठी पाच चमू गठित करण्यात आले. त्यात गोंदियाच्या स्थानिक गुन्हे शाखेचा एक चमू, तिरोडा ठाणेदार योगेश पारधी यांचा दुसरा चमू, सहायक पोलीस निरीक्षक हनवते यांचा तिसरा चमू, सहायक पोलीस निरीक्षक जोगदंड यांचा चौथा चमू तर महिला पोलीस उपनिरीक्षक राधा लाटे यांचा पाचवा चमू गठित करण्यात आला. हे सर्व चमू कामाला लागले आहेत.
.....................