गलिच्छ गोंदियाचा ३४३ वा क्रमांक
By admin | Published: May 7, 2017 12:13 AM2017-05-07T00:13:46+5:302017-05-07T00:13:46+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला महाराष्ट्राने काळीमा फासला असतानाच गोंदिया शहराने गलिच्छ शहरांच्या यादीत ३४३ वा क्रमांक गाठला.
स्वच्छता मिशन फसले : पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ला महाराष्ट्राने काळीमा फासला असतानाच गोंदिया शहराने गलिच्छ शहरांच्या यादीत ३४३ वा क्रमांक गाठला. स्वच्छतेसाठी देशपातळीवर सुरू असलेल्या या धडपडीत शहरात मात्र स्वच्छता मिशन फसल्याचे दिसून येत असून यातून नगर पालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
अवघ्या देशाचे चित्र बदलविण्याचे मानस बाळगून पंतप्रधानांनी ‘स्वच्छ भारत मिशन’ हाती घेतले. नव्यानव्यात सर्वांनाच याचा हुरूप आला होता. मात्र ‘चार दिन चांदनी’ चा प्रकारही या मोहिमेप्रती जाणवला. परिणामी सर्वांनीच हळूहळू या मोहिमेला बगल देत आपली दिनचर्या सुरू ठेवली. हेच कारण आहे की, महाराष्ट्र या मोहिमेत महागलिच्छराष्ट्राच्या किताबाने नवाजल्या गेला. जेथे राज्याच माघारले आहे तेथील गोंदिया शहराची शान काही औरच आहे.
चालायला धड रस्ते नसलेल्या या शहराची स्थिती अतीशय भयंकर आहे. त्यात स्वच्छतेचे तीन तेरा वाजल्याचे शहरातील कोणत्याही कोपऱ्यात जावून बघता येते. हेच कारण आहे की, गोंदिया शहराने सर्वेक्षणात ३४३ वा क्रमांक पटकाविला आहे. जेथील नाल्यांची सफाई होत नाही. कचऱ्याचे ढिगार लागून असल्याचे दिसते. डुकरांचा मोकाट वावर अशा शहरापासून अपेक्षा तरी काय करायची अशा प्रतिक्रीयाही आता शहरवासी देत आहेत.
सर्वेक्षणातील शेवटच्या टोकावर मिळविलेल्या या क्रमांकावरून शहरातील स्वच्छतेची स्थिती किती गंभीर आहे. तसेच शहरवासी किती भयंकर वातावरणात आपला श्वास घेत आहेत याची जाणीव होते. अशा या गलिच्छ शहरातील नगर पालिकेच्या कारभारावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण होतो. गलीच्छ असलेला गोंदिया कधी सुधरणार असा सवाल नागरिक करीत आहेत.