करुझरी सुविधांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:06 PM2018-10-25T22:06:40+5:302018-10-25T22:07:18+5:30
तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त संपूर्ण आदिवासी गाव करुझरी गावात ये-जा करण्याकरीता रस्ता नसल्याने हे गाव सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासन आणि प्रशासनाने अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे गावकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
प्राप्त माहितीनुसार, गट ग्रामपंचायत पळसगाव (चुटिया) अंतर्गत येणाºया करुझरी गावाला ये-जा करण्यासाठी अद्यापही रस्ता नाही. एकीकडे शासन पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागात रस्त्याचे जाळे तयार करण्याचा दावा करीत आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही करुझरी गाव रस्त्याच्या सुविधेपासून वंचित आहे. दरम्यान याची दखल घेत काँग्रेस कमिटीचे महासचिव सहसराम कोरोटे यांनी करुझरी येथे भेट देवून गावातील समस्यांची पाहणी केली. या वेळी त्यांच्यासोबत पळसगावचे सरपंच फुलवंता बागडेरीया, माजी पं.स. सदस्य व धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष सोनू नेताम, माजी सभापती वसंत पुराम, उमेश बागडेरीया, धुरसिंग मडावी, ममता कुंभरे, रामहरी नेताम, नामदेव भोयर, रामदास सलामे, मदनलाल ताराम, शामलाल कुंभरे, मंगलू कुंजाम, शिवलाल मडावी, पोलीस पाटील चौधरी, ताराचंद चनाप, मन्साराम कुंभरे, महिला धुर्व गोंड समाजाचे अध्यक्ष पुशो ओटी, वच्छला दर्रो, फुलवंता कल्लो व रुकमीनी ताराम उपस्थित होते. याप्रसंगी गावातील लोकांनी गावात जि.प.ची प्राथमिक शाळा आहे. या गावात ये-जा करण्यासाठी केवळ एकच रस्ता असून तो देखील पूर्णपणे अविकसीत आहे. पावसाळ्यात करुझरी नाल्यावरुन पाणी वाहत असल्याने या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटतो. त्यामुळे एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी विविध अडचणीना तोंड द्यावे लागते. येथे पूल तयार करण्यासाठी शासनाने २०१५-१६ या वित्तीय वर्षात ३३ लाख २९ हजार २०० रुपये निधी मंजूर केला होता. या निधीतून या कामावर अकुशल कामे करण्यात आली. यावर २ लाख ५० हजार रुपये खर्चही झाले. मात्र सध्या स्थितीत या पुलाचे काम सुध्दा बंद आहे. याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.
सिंचनाच्या सोयीचा अभाव
करुझरी येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. मात्र सिंचनाच्या सोयींचा अभाव असल्याने शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. या परिसरात सिंचनाच्या सोयी केल्यास शेतकऱ्यांना त्याची मदत होईल.
आंदोलन छेडण्याचा इशारा
करुझरी हे गाव स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही मुलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे. मात्र शासनाने याची अद्यापही दखल घेतली नाही. त्यामुळे या गावातील गैरसोयी दूर करुन हे गाव केव्हा विकासाच्या प्रवाहात येणार असा सवाल सहषराम कोरोटे यांनी शासनाला केला. करुझरी येथे ये-जा करण्यासाठी रस्ता तयार न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कोरोटे यांनी दिला आहे.