आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:00:39+5:30
सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जाते. सध्या पावसाचा हंगाम आहे. साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप खोकला आजारांची साथ सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : जवळील ग्राम चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिसरातून येणाºया रुग्णांना ताटकळत बसून वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करावी लागते. सकाळी रूग्णांची गर्दी असते. मात्र कार्यरत वैद्यकीय अधिकारी वेळेच्या आत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतच नाही अशी सामान्य जनतेची ओरड आहे. कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अपडाऊनमुळे दररोज विलंब होत असल्याने परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. बाह्य रुग्णांना ताटकळत डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते.
सर्वत्र कोरोनाचा कहर आहे. गावागावातील सामान्य जनता दहशतीखाली वावरताना दिसत आहे. ग्रामस्थांना वेळीच आरोग्य सेवा मिळावी म्हणून शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न केले जाते. शिवाय गावातील कोणताही व्यक्ती आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये याची दक्षता घेतली जाते. सध्या पावसाचा हंगाम आहे. साथीच्या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ताप खोकला आजारांची साथ सुरु आहे. मात्र ग्राम चान्ना-बाक्टी येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात दिसत आहे. चान्ना-बाक्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आजघडीला डॉ. श्वेता कुलकर्णी व डॉ. कुंदन कुलसुंगे हे २ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. त्यातील डॉ. कुलसुंगे यांची बोंडगावदेवी येथील जि.प. आयुर्वेदिक दवाखान्यात सोमवार, बुधवार व शनिवार असे ३ दिवस आठवड्यातून प्रतिनियुक्ती केली आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण तपसणीची वेळ सकाळी ८ ते १२ वाजतापर्यंत निर्धारित केली आहे. मात्र दवाखान्याच्या निर्धारित वेळेत वैद्यकीय अधिकारी कधीच येत नाही असे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेलेले सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र शेंडे यांनी सांगितले.
दवाखान्याची कमान सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकारी वेळेच्या आत येत नाही ही नित्याचीच बाब असल्याचे समजते. गुरुवारी (दि.१३) प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेल्यानंतर खरा प्रकार आढळला.
११ वाजतापर्यंत वैद्यकीय अधिकाºयांचा थांगपत्ता नव्हता. दवाखान्यातील एका कर्मचाºयाने भ्रमणध्वनीवरुन त्यांना फोन लावला असता २ वाजतानंतर येते असा निरोप आला. वरिष्ठांची मर्जी असल्याने पीएचसीत अनियमिततेचा कळस गाठला जात असल्याचे बोलले जात आहे.
कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त प्रशस्त असे निवासस्थान आहेत. हल्ली दोन्ही वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहता आपल्या सोयीने आवागमन करतात. यातील एक वैद्यकीय अधिकारी १५ किमी. तर दुसरा वैद्यकीय अधिकारी ३ किमी. अंतरावरुन येऊन कर्तव्य बजावतात अशी ओरड आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ये-जा प्रवृत्तीने गावखेड्यातील सामान्य जनतेला नाहक ताटकळत राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आरोग्य केंद्रात दिसून येत आहे. कोरोना परिस्थितीत सामान्य जनतेला आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलण्याची गरज आहे.