रुग्णवाहिकेअभावी गर्भवतीची गैरसोय ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:32 AM2021-08-13T04:32:34+5:302021-08-13T04:32:34+5:30
आमगाव : तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भवतींना त्रास सहन ...
आमगाव : तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गर्भवतींना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र आरोग्य विभागाने याची अद्यापही दखल घेतली नाही. गर्भवतींना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक भुर्दंड आणि त्रास सहन करावा लागत आहे.
कालीमाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ७ उपकेंद्र असून ४० हजार लोकसंख्येचा भार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी हे उपकेंद्र सुरु करण्यात आले आहे. मात्र त्यात सोयी सुविधा उपलब्ध करुन न देण्यात आल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. कालीमाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक वर्षांपासून सक्षम वैद्यकीय अधिकारी मिळत नव्हते. पण नुकतेच एमबीबीएस महिला डॉक्टर देव रूपाने मिळाल्या. त्यांनी सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेसाठी सक्रिय केले. त्यामुळे परिसरातील रुग्णांना वेळीच उपचार मिळण्यास मदत झाली. पण आरोग्य केंद्रात पाच महिन्यांपासून रुग्णवाहिका नसल्याने रुग्ण आमगाव किंवा गोंदिया येथे रेफर करण्यात त्रास सहन करावा लागत आहे. अशावेळी रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन रुग्णवाहिका त्वरित उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सरपंच शीला चुटे, उपसरपंच प्रशांत बहेकार, राजीव फुंडे यांनी केली.