पंतप्रधान मोदी, प्रफुल्ल पटेल यांच्यात विमानतळावर चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 07:02 AM2023-11-06T07:02:43+5:302023-11-06T07:02:56+5:30
राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असून या पार्श्वभूमीवरही दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
गोंदिया : मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी शिवणी (मध्य प्रदेश) येथे प्रचार सभा होती. शिवणीला जाण्यासाठी त्यांचे गोंदियामधील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता आगमन झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि खासदार पटेल यांच्यात सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली.
गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतील विकासकामे, बिरसी विमानतळावरून १ डिसेंबरपासून सुरू होत असलेली प्रवासी विमान वाहतूक, कार्गो सेवा सुरू झाल्यास कृषी मालाच्या निर्यातीसाठी होणारी मदत, रोजगाराच्या संधी आदी विषयांवर पंतप्रधान मोदी आणि खासदार पटेल यांच्यात चर्चा झाली. राज्यात शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या आमदार अपात्रतेबाबत सुनावणी सुरू असून या पार्श्वभूमीवरही दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
बिरसी विमानतळावर पंतप्रधानांचे आगमन होणार असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील चार दिवसांपासून हा परिसर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्यात आला होता. तीन दिवसांपासून पोलिसांच्या विविध पथकांची मॉकड्रिल सुरू होती. पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याविषयी कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.