धानपिकावर गादमाशी, तुडतुड्यासारख्या रोगांचा प्रहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:08+5:302021-09-27T04:31:08+5:30
वामन लांजेवार शेंडा कोयलरी : या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. ...
वामन लांजेवार
शेंडा कोयलरी : या परिसरात रोवणीच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यामुळे, धानपिकावर कोरड्या दुष्काळाचे सावट होते. नंतर अतिवृष्टीचा कहर झाल्याने हलक्या प्रतीच्या धानाला व मुख्यत्वे करून हायब्रीडला गादमाशीने ग्रासले आहे. परिणामी धानपीक धोक्यात आले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही हलक्या प्रतीच्या धानावर तुडतुड्यांचा प्रकोप दिसून येत आहे. किटकनाशकाची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा, मसरामटोला, आपकारीटोला, कोहळीपार, पांढरवाणी, कोयलारी, मोहघाटा, उशिखेडा, कन्हारपायली, पाटीलटोला, सालईटोला, प्रधानटोला, नरेटीटोला व पुतळी हा आदिवासीबहुल परिसर असून, या परिसरात शेती हाच या भागातील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. सध्या हलक्या प्रतीचे धान निसवले असून, अवघ्या काही दिवसांतच कापणीयोग्य होणार आहे. मात्र पाऊस दररोज बरसत असल्याने आणि ढगाळ वातावरणाने धान पिकावर मावा, तुडतुडा, गादमाशी, खोडकिडासारख्या कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे धानपीक धोक्यात आले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.
......
जड धानावरही संकट
या परिसरातील शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सोयी उपलब्ध असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वत:च्या दैनंदिन उपयोगासाठी उच्च प्रतीच्या धानाची लागवड केली आहे. ते धान सध्या निसवत असून, त्यावरही कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. महागड्या किटकनाशकाची फवारणी करून सुद्धा धानावरील रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. याचा परिणाम धानपिकावर होईल. परिणामी, यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादनात कमालीची घट होणार असून, शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता आहे.
............
शेतकऱ्यांना कर्जफेडीची चिंता
यावर्षी बँकेने बहुतांश शेतकऱ्यांना पीक कर्ज देणे नाकारल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. काहींनी उधार उसने करुन धानपिकाची लागवड केली, तेही रोगांच्या प्रादुर्भावाने धोक्यात आले आहे. त्यामुळे परतफेडीचा प्रश्नही शेतकऱ्यांना भेडसावत आहे. शेती व्यवसायाला जोड म्हणून या परिसरात एखाद्या छोट्यामोठ्या उद्योग धंद्याची नितांत गरज आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून लक्ष देण्याची गरज आहे.