सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीचा विळखा
By admin | Published: January 18, 2015 10:46 PM2015-01-18T22:46:38+5:302015-01-18T22:46:38+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे.
गोंदिया : शहराच्या मध्यभागी असलेल्या सरकारी तलावाला घाण व दुर्गंधीने विळखा घातला आहे. आजघडीला हा तलाव कचरा टाकण्याचे ठिकाण व परिसरातील नागरिकांचे शौचास बसण्याचे केंद्र बनला आहे. त्यातच शहरातील सांडपाणीही जात असल्याने दुर्गंधीचा जोर वाढतच चालला आहे. यामुळे तलावाच्या पाण्याची दुर्गंधी येत असून याचा त्रास तलावाच्या सभोवताल असलेल्या कुटुंब तसेच परिसरातील व्यापाऱ्यांना सहन करावा लागत आहे. मात्र याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष असून नागरिकही स्वत:ची सामाजिक जबाबदारी विसरले असल्याचे दिसून येत आहे.
सरकारी तलावामुळे जमिनीतील पाण्याचे स्तर वाढण्यास मदत होत आहे. असे असताना मात्र या तलावाचे आता हाल होऊ लागले आहेत. तलावात सांडपाणी जात असल्याने तलावाचे पाणी खराब झाले आहे. शिवाय यातून दुर्गंध पसरत असल्याने येथील नागरिकही यापासून त्रस्त झाले आहे. येथे पसरलेल्या घाणीमुळे डुकरांचा वावर वाढला आहे.
या तलावाच्या काठावरच हनुमानाचे मंदिर आहे. परिसरातील रहिवासी या मंदिरात विविध सण व उत्सव साजरा करीत असल्याने नेहमीच येथे रेलचेल असते. तर जवळच दरगा असल्याने तेथेही मोठ्या प्रमाणात भाविकांची ये-जा सुरू असते. शिवाय सरकारी तलावाचा हा भाग बाजार भागाशी जुळलेला असल्याने मोठ्या प्रमाणात दुकाने ही येथे आहेत. अशात तलावातील दुर्गंधीमुळे व्यापाऱ्यांनाही नाक दाबबन बसावे लागत आहे. शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टीने तलावाचे पाणी चांगले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र तलावातील पाणी घाण झाल्यामुळे यावर त्वरित उपाययोजनेची गरज आहे.
या तलावाच्या बाजूने अंडरग्राऊंड मार्ग जातो. या रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यांतून तलावाचे पाणी वाहत असल्याने येथून ये-जा करणाऱ्यांनाही याची झळ सहन करावी लागते. शहराची धरोहर असलेल्या या सरकारी तलावाची योग्यरीत्या जोपासना व सौंदर्यीकरण केल्यास एक आकर्षक स्थळ गोंदियावासीयांना लाभ शकते.
मात्र प्रशासनाची उदासीनता या तलावाच्या विकासाच्या आडी येत आहे. परिणामी सरकारी तलाव आपले अस्तित्व गमावू लागला आहे. शिवाय मानवाच्या अतिरेकामुळे तलावात घाण पसरत असून आज परिसरातील नागरिकांना हा तलाव नकोसा होऊ लागला आहे. (शहर प्रतिनिधी)