रूग्णालयाला घाणीचा विळखा
By admin | Published: August 15, 2016 12:16 AM2016-08-15T00:16:41+5:302016-08-15T00:16:41+5:30
येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे.
- ढिगार करते स्वागत : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
- गोंदिया : येथील बाई गंगाबाई रूग्णालयाला लागलेला घाणीचा विळखा काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. प्रवेशव्दारापासूनच येथे घाण साचली असून अशाच वातावरणात येथील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांना वावरावे लागत आहे. हे रूग्णालयच आजारांचे ठिकाण उत्पादक बनले असून येथे वावरणाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे बोलणे वावगे ठरणार नाही.
महिला व चिमुकल्यांसाठीची सोय येथील बाई गंगाबाई रूग्णालयात करण्यात आली आहे. आजघडीला रूग्णालयाचे मुख्य द्वार सिव्हील लाईन्स परिसरातून आहे. मात्र हे रूग्णालयाचे मुख्य द्वार आजारांचे मुख्य द्वार बनले आहे. त्याचे कारण असे की, प्रवेशद्वाराच्या अवतीभवती कचऱ्याचे ढिगार लागून आहेत. रूग्णालयातील कचरा व रूग्णालयात वावरणारे येथेच काचरा टाकून मोकळे होतात. परिणामी येथील कचऱ्याची समस्या काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे.
रूग्णालयातील सफाईचे कंत्राट महावत यांच्याकडे आहे. त्यांच्याकडून नियमीत सफाई केली जात असल्याचे दिसते. मात्र रूग्णालयातील कचरा ते रूग्णालयासमोर असलेल्या शासकीय क्वार्टसच्या मोकळ््या जागेत टाकतात. परिणामी येथे कचऱ्याची खाणच तयार झाली आहे. विशेष म्हणजे सध्या पावसाळा सुरू असून पावसामुळे ही घाण कुजून त्यातून दुर्गंध पसरत आहे. शिवाय रूग्णालयाच्या आतील नाल्याही सांडपाण्याने बरबटलेल्या आहेत. तर रूग्णालयातील रूग्णांच्या नातेवाईकांकडूनही वापरण्यात आलेल्या पाण्याचे डबके रूग्णालयात दिसतात.
यातून डासांचा प्रादुर्भाव होणार व त्यापासून आजार पसरणार यात शंका नाही. रूग्णालयात गर्भवती महिला व नवजात शिशु असतात हे विशेष.