जिल्ह्यातील ३०४ शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:37 AM2021-04-30T04:37:44+5:302021-04-30T04:37:44+5:30
गोंदिया: ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू ...
गोंदिया: ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ५० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेले विचार आजच्या समाजातही तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या तत्कालीन पिढीतील गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक आजही त्यांच्या विचारांचा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवित आहेत. गोंदिया जिल्ह्यातील ३०४ शाखांमधून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार-प्रसार गावागावांत होत असून त्यांच्या कीर्तनाचा गजर अनेक गावांत समाजाला घडविण्याचे काम करीत आहे.
गोंदिया जिल्ह्यात स्वातंत्र्यानंतर तुकडोजी महाराजांचे कीर्तन, प्रबोधन अनेक गावांत झाले. त्यातून प्रेरित झालेले अनेक लोक गुरुदेव सेवा मंडळाचे सेवेकरी होऊन आयुष्यभर त्यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार करीत आहेत. त्यामुळेच महाराजांची १०६ वी जयंती गुरुकुंज आश्रमाबरोबर गोंदिया जिल्ह्यातही अनेक ठिकाणी साजरी करण्यात येत आहे. यंदा कोरोनाचे संकट असल्यामुळे गुरुदेवप्रेमी घरातच ग्राम जयंती साजरी करणार ओहत. तुकडोजी महाराजांच्या कीर्तनातून प्रेरणा मिळालेले जिल्ह्यातील त्यावेळचे बालक आताचे ज्येष्ठ नागरिक आहेत. आताही ते गावागावांत गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून जनजागृती करतात. व्यसनाधीनता, दारू, गांजा, चोरी यावर तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या भजनांच्या माध्यमातून जनजागृती करतात. भ्रूणहत्या, आत्महत्या करू नका असा संदेश देत शरीर स्वच्छतेबाबत वैचारिक दृष्टिकोन बदलविण्यासाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता, लहर की बरखा, अभंग, विविध भजनांची पुस्तके समग्र वाङ्मयाच्या माध्यमातून प्रबोधन करतात; परंतु मागच्या वर्षीपासून कोरोनाचे संकट पाहून ग्राम जयंती घरातूनच साजरी करू, असे सर्वाधिकारी ह.भ.प. एम. ए. ठाकूर म्हणाले.
बॉक्स
जिल्ह्यात १४ ग्रामगीताचार्य
जिल्ह्यात राष्ट्रसंताच्या विचारांनी प्रेरणा घेऊन गावागावांत राष्ट्रसंताचे कार्य पोहोचविणाऱ्या गुरुदेव सेवकांनी राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेचा अभ्यास करून ग्रामगीताचार्य पदवी प्राप्त केली. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत १४ ग्रामगीताचार्य झाले आहेत. ते ग्रामगीताचार्य राष्ट्रसंताचे विचार समाजात पेरण्याचे काम करीत आहेत.