तंमुस पुरस्कार राशीचे वितरण व सत्कार समारंभ
By admin | Published: February 10, 2017 01:18 AM2017-02-10T01:18:32+5:302017-02-10T01:18:32+5:30
जवळच्या खांबी ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार राशीचे वितरण
बोंडगावदेवी : जवळच्या खांबी ग्रामपंचायत तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार राशीचे वितरण व ग्रामस्थांचा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.
अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती अरविंद शिवणकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लायकराम भेंडारकर, सरपंच शारदा खोटेले, उपसरपंच प्रमोद भेंडारकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सीयाराम तांडेकर, माजी तंमुस अध्यक्ष नारायण भेंडारकर, पंचायत समितीचे शाखा अभियंता टी.पी. कचरे, ग्रामसेवक के.टी. तुरकर उपस्थित होते.
सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुन सभापती शिवणकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
ग्रामपंचायत व महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गावात विविध उपक्रम राबवून गावात सलोख्याचे वातावरण निर्मिती केली. गावातील तंटे गावामध्ये मिटविण्यावर भर देण्यात आला. महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला दोन लाखांच्या पुरस्कार स्वरूपात निधी प्राप्त झाला होता.
पुरस्कार राशीमधून गावाच्या प्रारंभी देखणा असा प्रवेशद्वार बांधण्यात आला. गावातील मुली विवाह होऊन बाहेर गावी संसार करीत असलेल्यांना माहेरभेट, ज्यांनी मुलींना जन्म दिला अशांना कन्यारत्न, ज्यांनी व्यसनाला झिडकारले त्यांना व्यसनमुक्ती अशांचा गौरव करण्यात आला.
अनाथांना शिष्यवृत्ती तसेच ईयत्ता दहावी व बारावीमध्ये गुणाणुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार राशी देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाला माजी सरपंच बसुराज शेंडे, सदस्य सुदेश खोटेले यासह गावातील बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रामसेवक के.टी. तुरकर यांनी केले. आभार माणिक खोटेले यांनी मानले. (वार्ताहर)