सोमवारपासून होणार जमिनीच्या पट्ट्यांचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:27 AM2021-03-21T04:27:24+5:302021-03-21T04:27:24+5:30
आमगाव : नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या ग्राम रिसामा येथील जमिनीच्या आखीव पत्रिका नसल्याने येथील मालमत्ताधारकांना जमिनीची खरेदी-विक्री करताना ...
आमगाव : नगर परिषदेंतर्गत येत असलेल्या ग्राम रिसामा येथील जमिनीच्या आखीव पत्रिका नसल्याने येथील मालमत्ताधारकांना जमिनीची खरेदी-विक्री करताना अडचण येत होती. अशात त्यांनी त्यांच्या जमिनीची आखीव पत्रिका तयार करून देण्याबाबत शासनाकडे मागणी केली होती. त्यांची ही मागणी आता पूर्ण होणार असून, रिसामा येथील मालमत्तांचे ७-१२ तसेच आखीव पत्रिका तयार होणार असून, त्यांचे वितरण सोमवारपासून (दि.२२) होणार आहे.
रिसामा येथील नागरिकांच्या मागणीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी १७ ऑक्टोबर २०१५ व देवरी येथील उपविभागीय अधिकाऱ्यांनी १४ ऑगस्ट २०१५ च्या पत्रांच्या आधारे येथील भूमी अभिलेख कार्यालयाने ३ नोव्हेंबर २०१५ पासून सुटलेल्या जमिनीचे सर्वेक्षण मोजणी व चौकशीला सुरुवात केली होती. संपूर्ण सर्वेक्षण १४ मार्च २०१६ ते १६ जून २०१७ दरम्यान भूमी अभिलेख अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आटोपून घेतले, तसेच काही प्रस्तावांतील त्रुटींचा नियमित पाठपुरावा भूमी अभिलेख कार्यालयाने केला. अंतिम प्रस्ताव २४ फेब्रुवारी २०२० रोजी भूमी अभिलेख कार्यालयाने जमाबंदी आयुक्तांना (पुणे) सादर केला होता. कोरोना कारणामुळे या प्रस्तावाला १५ मार्च २०२१ रोजी मंजुरी मिळाली आहे. यामुळे येथील ३०९ प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. येथील नागरिकांनी सुरुवातीपासून सुरू केलेल्या या लढ्याला आता यश मिळाले आहे. या पट्ट्यांचे वितरण सोमवारपासून (दि.२२) भूमी अभिलेख कार्यालयात केले जाणार आहे, तसेच यासाठी ४३.९० रुपये चौमी असे शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
-------------------
३०९ मालमत्ताधारकांना दिलासा
जमिनीच्या पट्ट्यांचा मार्ग मोकळा झाल्याने रिसामा येथील ३०९ मालमत्ता नियमित होणार असून, मालमत्ताधारकांना दिलासा मिळाला आहे. यामध्ये २४८ खासगी जमीन, २१ सरकारी जमीन, ३६ शेती तर ४ धार्मिक स्थळांचा समावेश आहे.