आठ हजार शेतकऱ्यांना कीटकनाशक वाटप
By admin | Published: September 21, 2016 12:56 AM2016-09-21T00:56:34+5:302016-09-21T00:56:34+5:30
रोगराईची रोकथाम करून धोक्यात आलेल्या पिकांच्या सुरक्षेसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना किटकनाशकांचे वितरण करण्यात आले आहे.
रोगराईला लगाम : दोन प्रकारच्या कीटकनाशकांचे वितरण
गोंदिया : रोगराईची रोकथाम करून धोक्यात आलेल्या पिकांच्या सुरक्षेसाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना किटकनाशकांचे वितरण करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांना दोन प्रकारचे किटकनाशक वितरीत करण्यात आले असून आठ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील काही किटकनाशक अनुदानावर तर काही नि:शुल्क देण्यात आले आहे.
कधी पाऊस तर कधी उन्ह यामुळे जिल्ह्यातील वातावरण पिकांना कमी व रोगराईंना चांगलेच मानवले. याचा परिणाम असा झाला की, पिकांवर विविध प्रकारच्या रोगराई व किटकांनी आपला हल्ला चढविला होता. रोगराईच्या या हल्यामुळे उत्पादन घटणार असल्याची भितीही निर्माण झाली होती व त्यामुळे शेतकरीही चिंतेत होते. रबीचा हंगाम जसा-तसा गेला मात्र खरिपात चांगले उत्पादन घेऊन स्थिती सावरण्याचा अंदाज शेतकरी बांधून होते. मात्र रोगराईने त्यांच्या या अंदाजावर पाणी फेरण्याचे सावट निर्माण झाले होते.
शेतकऱ्यांची ही चिंता दूर करता यावी तसेच रोगराईमुळे उत्पादनावर फटका पडू नये यासाठी कृषी विभागाने किटकनाशक मागविले होते. मागणीनुसार कृषी विभागाकडे क्लोरो पायरीफॉस व वर्टीसिलीयम लेकानी हे दोन प्रकारचे किटकनाशक पाठविण्यात आले होते. कृषी विभागाकडून त्यांचे तालुकानिहाय वितरण करून रोगराईवर रोकथाम करण्यात आली. परिणामी आजघडीला पिकांवरील रोगराई संपुष्टात आली असल्याचेही कृषी विभागाकडून कळले. तर यामुळे उत्पादनात भर पडणार असल्याचा अंदाजही कृषी विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.
दमदार पावसाचाही मिळाला फायदा
रोगराईच्या निर्मुलनासाठी कृषी विभागाकडून किटकनाशकांचे वितरण करण्यात आले. असे असताना मागच्या आठवड्यात जिल्ह्यात बरसलेल्या दमदार पावसाने पिकांना चांगलाच फायदा मिळाला. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असतानाच किडींनाही नष्ट केले. सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रात असलेली ही पावसाने धुवून काढली.
परिणामी आजघडीला पिक रोगमुक्त झाले असून चांगले उत्पादन मिळणार असल्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. काही दिवसांत एक पाऊस आल्यास तोही फायदेशीर ठरणार आहे. (शहर प्रतिनिधी)