शंभर कोटीच्या निधी अभावी रखडले बोनसचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 11:23 PM2020-05-09T23:23:41+5:302020-05-09T23:25:08+5:30
जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत बोनस देण्यात येणार होते. यात ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये प्रती क्विंटल दरात केलेली वाढ असे एकूण ७०० रुपये बोनस मिळणार आहे. यातंर्गत शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११३ कोटी रुपयांच्या बोनसचे वाटप करण्यात आले आहे. मात्र १०० कोटी रुपयांचा निधी प्राप्त न झाल्याने बोनसचे वाटप रखडले आहे.
जिल्ह्यात खरीपात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळातंर्गत हमीभावानुसार धान खरेदी केली जाते. ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन ३५ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली होती.शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत ७०० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.त्यानुसार जिल्ह्यातील एकूण ९५ हजार ७३४ शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी २१३ कोटी रुपयांच्या निधीची गरज होती. यापैकी पंधरा दिवसांपूर्वी शासनाने ११३ कोटी रुपयांचा निधी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला उपलब्ध करुन दिला होता. त्यानंतर बोनसचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे. शेतकऱ्यांना बोनस वाटप करण्यासाठी पुन्हा १०० कोटी रुपयांची गरज आहे. मात्र शासनाकडून मागील पंधरा दिवसांपासून हा निधी न मिळाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना बोनस मिळण्याची प्रतीक्षा कायम आहे.
एकीकडे लॉकडाऊन आणि संचारबंदी तर दुसरीकडे खरीप हंगाम तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे.त्यामुळे बोनसची रक्कम लवकर मिळाल्यास शेतकऱ्यांना तेवढीच मदत होणार असल्याने सर्व शेतकºयांच्या नजरा सध्या याकडे लागल्या आहे.
६ लाख बारदाना आला मात्र खरेदी सुरु होईना
रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले असून एकूण ७० धान खरेदी केंद्रावरुन खरेदी केली जाणार आहे. यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला ६ लाख बारदाना सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र आदेशानंतरही बºयाच केंद्रावर धान खरेदी सुरू झाली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
खरेदी केंद्रावर करावी लागणार जंतुनाशक फवारणी
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची होणारी गर्दी लक्षात घेवून खबरदारीचा उपाय म्हणून खरेदी केंद्रावर दिवसांतून दोनदा जंतूनाशक फवारणी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. तसेच खरेदी केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचे सूचना दिल्या.गर्दी टाळण्यासाठी टोकन पध्दतीने धान खरेदी करावी असे निर्देश सुध्दा जिल्हा प्रशासनाने सर्व खरेदी केंद्र संचालकांना दिले आहे.
शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम वाटप करण्यासाठी आत्तापर्यंत ११३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वळता करण्यात आला आहे.बोनस वाटपासाठी पुन्हा शंभर कोटी रुपयांची गरज असून निधी प्राप्त होताच बोनस वाटप केले जाईल.
- गणेश खर्चे
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी.