जिल्ह्यात २२८ बालके तीव्र कुपोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:54 AM2018-10-20T00:54:24+5:302018-10-20T00:56:35+5:30
आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत.
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : आदिवासी व नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील गोंदिया जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात महिला व बाल कल्याण विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. या विभागाच्या उदासिनतेमुळे जिल्ह्यात १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. कुपोषणाच्या तिव्र श्रेणीत २२८ बालके असून या बालकांपैकी ११३ बालकांना एकात्मिक बाल विकास केंद्रामध्ये (व्हीसीडीसी) दाखल करण्यात आले.
गोंदिया जिल्ह्यात कुपोषित १०३८ बालके कुपोषणाच्या श्रेणीत आहेत. यातील २२८ बालके तिव्र कुपोषित म्हणजे (सॅम) व ८१० बालके मध्यम तिव्र कुपोषणाच्या (मॅम) या श्रेणीत आहेत. या कुपोषित बालकांसाठी चार तालुक्यात ५४ ठिकाणी एकात्मिक बाल विकास केंद्र सुरू करण्यात आली.
या केंद्रावर सॅमचे १४ व मॅमचे ५६ बालकांचा समावेश आहे. १८ बालकांच्या आरोग्यात सुधारणा झाली आहे. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ११ बालकांचा समावेश आहे. या वेळी सॅमचे १२८ व मॅमचे ८० बालके आहेत. कुपोषण कमी करण्यासाठी व्हीसीडी स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कुपोषणावर मात जेवढ्या पध्दतीने व्हायला पाहिजे तेवढे नियंत्रण झाले नाही.
जिल्ह्यात अर्जुनी-मोरगाव व तिरोडा तालुक्यात चाइल्ड ट्रीटमेंट सेंटर (सीटीसी) सुरू करण्यात आले आहे. बाई गंगाबाई महिला रूग्णालयात न्यूट्रेशियन रिहबेट सेंटर (एनआरसी) सुरू आहे. आरोग्य विभाग व एकात्मिक बाल विकास केंद्राच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचे काम केले जात आहे. परंतु ते काम संथ गतीने सुरू आहे.
गर्भवतींकडे होतोय दुर्लक्ष
महिला गर्भवती असताना तिला संतुलीत आहार देणे गरजेचे असते. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व गरीब कुटुंबातील लोक गर्भवती महिलेच्या आहाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने गर्भातच बाळाची वाढ खुंटते. परिणामी कुपोषित बालके जन्माला येतात. महिलांना गर्भावस्थेत आहार कसा द्यावा याची माहिती कुटुंबीयांना दिली जात नाही. परिणामी कुपोषणाच्या समस्येत वाढ होत आहे.
अंगणवाडीतून मिळणारा आहार जनावरांना
गर्भवती, किशोरवयीन मुली किंवा बालकांना महिन्याकाठी पोषण आहार म्हणून महिला बाल कल्याण विभागाच्या अंगणवाड्यामार्फत पोषण आहार दिला जातो. परंतु त्या आहारात रुचकरपणा नसल्यामुळे गर्भवती महिला, किशोरवयीन मुली व बालके तो आहार खात नाही. परिणामी तो आहार जनावरांना दिला जातो.
५२ बालके कुपोषणाच्या संकटात
ग्राम बाल विकास केंद्रात दाखल करण्यात आलेल्या बालकांपैकी ५२ बालके आजही कुपोषणात आहेत. यात सॅमचे ७ तर मॅमच्या ४५ बालकांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११३ बाल विकास केंद्र सुरू आहेत. यात सॅमचे १२२ तर मॅमचे ८० बालके दाखल आहेत.