निवडणुकीदरम्यान सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 10:00 PM2018-05-15T22:00:07+5:302018-05-15T22:00:17+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असले तरी सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. या काळात सीमेलगतच्या जिल्ह्यातून अवैद्य दारु व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील प्रशासन सज्ज असले तरी सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने सतर्क राहणे आवश्यक आहे. या काळात सीमेलगतच्या जिल्ह्यातून अवैद्य दारु व पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. निवडणूक आयोगाचे निर्देश लक्षात घेता भंडारा-गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या जिल्हा प्रशासनाने याबाबतीत विशेष पथकाची नियुक्ती करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा, अशा सूचना निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय येथे सीमेलगतच्या बालाघाट, राजनांदगाव, नागपूर ग्रामीण, गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस निवडणूक निरिक्षक मो. शफी उल हक, जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे व इतर अधिकारी उपस्थित होते.
सीमेलगतच्या जिल्हा प्रशासनाने भंडारा-गोंदिया जिल्हा प्रशासनाशी समन्वय ठेवावा असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, सीमेलगतच्या परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर विशेष लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सीमेलगच्या भागातून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक निवडणूक असलेल्या क्षेत्रात प्रवेश करणार नाही. तसेच मतदारावर विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव आणणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात यावी. दारु बंदी विभागाने जिल्ह्याच्या सीमा लगतच्या भागातील ५ किलोमीटर अंतरावर दारु विक्री होणार नाही, याबाबत पोलीस अधीक्षक बालाघाट, पोलीस अधिक्षक राजनांदगाव व नागपूर ग्रामीण यांच्यासोबत चर्चा करु न त्या अनुषंगाने उचित कार्यवाही करण्याबाबत सभेत निर्देश दिले.
भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व उपजिल्हाधिकारी निवडणूक भंडारा व गोंदिया यांनी आपले मोबाईल नंबर हे सीमेलगत भागातील अधिकारी यांच्यासोबत आदानप्रदान करण्याबाबत सूचना सभेत करण्यात आली.