फलोत्पादनात जिल्हा माघारला
By admin | Published: May 5, 2017 01:40 AM2017-05-05T01:40:46+5:302017-05-05T01:40:46+5:30
जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे संकटात असतानाही अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा कल धानपिकांकडेच असल्याचे दिसून येते
केवळ १५४ लाभार्थी : फळ पिकांकडे शेतकऱ्यांची अनास्था
गोंदिया : जिल्ह्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे संकटात असतानाही अधिक प्रमाणात शेतकऱ्यांचा कल धानपिकांकडेच असल्याचे दिसून येते. पारंपरिक शेतीला बगल देत फळपिकांचे उत्पादन घेवून शेतकऱ्यांनी आपले जीवनमान सुधारावे, असा शासनाचा हेतू आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी फलोत्पादनात अनुत्सुक असल्याने जिल्हा फलोत्पादनात माघारल्याचे दिसून येते.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील केवळ १५४ शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. त्यातही सुटी फुले उत्पादनाचा लाभ केवळ तीन शेतकऱ्यांनी घेतला.
तर मसाला पिके, हळद व सुकलेली मिरची याचा लाभ जिल्हाभरातील ७७ शेतकऱ्यांनी घेतला. भाजीपाला व फळपिकांसाठी मल्चिंगचा लाभ ६५ शेतकऱ्यांना मिळाला. तर पॅक हाऊसचा लाभ नऊ शेतकऱ्यांनी घेतला.
याशिवाय मागील आर्थिक वर्षात सामूहिक शेततळे, संरक्षित शेती, हरितगृह, शेडनेड हाऊस, हरितगृहामधील निविष्ठा व लागवड साहित्य आदींचा लाभच शेतकऱ्यांनी घेतला नसल्याचे समजते. यावरून फलोत्पानात शेतकऱ्यांची अनास्था असल्याचेच दिसून येते.
विशेष म्हणजे पॅक हाऊसचा लाभ ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना घेता येतो. यात दोन ते चार लाखापर्यंतची सदर योजना असून शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान दिले जाते. तर मल्चिंगचे अनुदान शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १६ हजार रूपये याप्रमाणे दिले जाते. मसाला पिकांवर हेक्टरी १२ हजार रूपये अनुदान दिले जाते. तर सुटी फुलांवर हेक्टरी १० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. (प्रतिनिधी)
अनुदान सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यात
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रम अभियानांतर्गत पॅक हाऊस सोडून इतर अनुदान संचालक, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे येथून सरसरट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गाच्या प्रस्तावांनुसार त्यांना अनुदान मंजूर केला जातो. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सदर अभियानांतर्गत ३१.१० लाखांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.