कर्जवाटपात जिल्हा बँक अग्रेसर
By Admin | Published: August 12, 2016 01:27 AM2016-08-12T01:27:44+5:302016-08-12T01:27:44+5:30
हंगामासाठी ठरवून दिलेल्या उद्दीष्टातील ८० टक्के कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे
८० टक्के वाटप : १२६ कोटी ५० लाखांचे उद्दीष्ट
गोंदिया : हंगामासाठी ठरवून दिलेल्या उद्दीष्टातील ८० टक्के कर्जवाटप करून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे सिद्ध करून दाखविले आहे. जिल्हा बँकेने यंदा आतापर्यंत ८० टक्के खरिप हंगामाचे कर्जवाटप केले आहे. १०१ कोटी ३ लाख ५० हजारांचे कर्जवाटप केले आहे.
धानाचे कोठार अशा गोंडस नावाने या जिल्ह्यातील शेती ओळखली जात असली तरी येथील शेतकऱ्यांची वास्तविक स्थिती कुणापासून लपलेली नाही. निसर्गाची अवकृपा वारंवार शेतकऱ्यांना सहन करावी लागते. यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. परिणामी येथील शेतकऱ्यांला कर्ज घेऊनच शेती करणे भाग पडते. यासाठी बँकांचे उंबरठे झिजविणे त्यांच्या नशिबीच लागले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात म्हणून शासनाने बँकांना कृषी कर्ज वाटपासाठी काही निकष व उद्दीष्ट ठरवून दिले आहेत. त्यानुसार या बँकांना शेतक ऱ्यांना कृषी कर्ज वाटप करावे लागते.
राष्ट्रीयकृत व खाजगी बँकाच काय तर सहकारी व ग्रामीण बॅकांनाही कर्ज वाटपाचे निकष लागू पडतात. हे असले तरिही कर्जवाटपात जिल्हा बँक नेहमी अगे्रसर राहत असल्याचे दिसून येते. यातून शेतकऱ्यांचा जिल्हा बँकेवरील विश्वास तसेच जिल्हा बँकेचा शेतकऱ्यांप्रती असलेला आत्मीयतेचा भाव दिसून येतो. परिणामी जिल्हा बँक ठरवून दिलेल्या उद्दीष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर्जवाटप करीत असते. यंदाही जिल्हा बँकेने ठरवून दिलेल्या उद्दीष्टाच्या ८० टक्के कर्जवाटप केले आहे
यंदा जिल्हा बँकेला १२६ कोटी ५० लाखांचे कर्जवाटपाचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. जिल्हा बँकेने १०१ कोटी ३.५० लाखांचे कर्जवाटप केले आहे. यात ३१ हजार १०७ हेक्टर क्षेत्रासाठी २९ हजार ६६४ सभासदांना हे कर्ज देण्यात आले आहे.